अहंकारी राज्य सरकारकडून पोरखेळ-देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले

1 116

मुंबई,दि11 ः
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारने सरकारी विमानातून हवाई प्रवासाची परवानगी नाकारल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल हे संविधानाने दिलेले सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील माणासोबत अशी वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती सांगितली नाही, हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हे सरकार अहंकारी असून, राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे’, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
“अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
“या सरकारएवढं अहंकारी सरकार मी पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार आणणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नसून राज्याची आहे. ज्याप्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे ते पाहता महाराष्ट्रात यासारखं सरकार आम्ही याआधी पाहिलेलं नाही. पोरखेळ लावला आहे. रस्त्यावरची भांडणं असल्यासारखं राज्य सरकार वागत आहे. यामुळे राज्यपालांचं काही वाईट होणार नाही, पण राज्याची प्रतिमा मलीन होत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. “जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

…तर जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने माफी मागण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारने माफी मागून हा विषय इथेच थांबवावा. तुम्ही राज्यपालांना विमानातून उतरवले, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल’, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही- प्रवीण दरेकर
या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे विरोदीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही. राजकारण आणि सूडभावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याची गरिमा राखयला हवी होती. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिले’, असे दरेकर म्हणाले.

काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नाही. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे कळाले.

error: Content is protected !!