चिंता एक आजार – मनाचे श्‍लोक (भाग 17)

0 203

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥17॥

अर्थ: माणुस सदानकदा लहान मोठ्या गोष्टींची चिंता करत असतो. पण कित्येकदा अचानक काही घडते जे त्याच्या ध्यानी मनी ही नसते. जे जे घडत असते ते कर्माच्या आधारे होते व आपण निरर्थक विचार करुन दु:खी न होता आला प्रसंगास धीराने सामोरे जावे.
वयाच्या 36व्या वर्षी रामदासस्वामी भारत भ्रमण करुन महाराष्ट्रात परत आले.
भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले.
मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर 24 वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणार्‍या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट
केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. 24 वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.
या मनाच्या श्‍लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि मनुष्य या संसारामध्ये सर्व गोष्टींची चिंता करीत बसतो, हे काम पूर्ण होईल का? ते मला मिळेल का? असं झालं तर काय करायचं? अशा कितीतरी गोष्टी, चिंता त्याला दिवस रात्र भेडसावत असतात. हळुहळु त्याचे ओझे लागत जाते ज्याचा दुष्प्रभाव त्याच्या वर्तमान काळावर होऊ लागतो.
व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे जाते तेव्हा मागील काळ हे भूतकाळ असतात. पाणी वाहात असते तेव्हा त्या त्या ठिकाणचे दोन्ही काळ हे वर्तमानकाळ असतात. आणि पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचे काळ हे त्याचे भविष्यकाळ असतात. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. जन्मलेले अजाण बाळ अल्लड असते जे पुढे खेळत बागडत मोठे होते, मग तारुण्याचा काळ येता बाल्य भूतकाळ बनते व वार्धक्याची म्हणजे भविष्य काळाची तजवीज करण्याची चिंता सतत वाटु लागते. ह्यामुळे तो सद्या असलेले सुख ही उपभोगु शकत नाही.
ग. दि. माडगूळकर यांनी या काळाचं सुंदर वर्णन एका गीतात शब्दांकित केले आहे..
मुकी अंगडी बाळपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी
लेणे वार्धक्याचे..
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे।
समर्थ म्हणतात कि मनुष्य भविष्याची चिंता करत बसतो नि वर्तमानातील कालावधी व्यर्थ घालवतो. जे घडायचं आहे ते घडणारच आपण व्यर्थ चिंता करत बसू नये. भविष्याची चिंता करण्यापेक्षा आली घडी सार्थकास नेण्यास उत्तमता आहे, याचा जर विवेकबुद्धीने विचार केला तर आयुष्य सुखकर होऊन जाईल.
बरें झालियाचे अवघे सांगाती ।- वाईटाचे अंतीं कोणी नाहीं ॥
तुकाराम गाथा 4380.
अर्थ: चांगलें चाललें असेल त्याच्या भोंवतीं सर्व जमतात पण जो अडचणींत असेल त्याच्याकडे कोणी ढुंकून पाहात नाहीं.
दैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो, ते सर्व अनाकलनीय असे आहेत. म्हणुन चिंता विवंचनेत वेळ घालवणे अनाठायी होता जाते.
त्यामुळे सरुन गेलेल्या भुतकाळाचे दु:ख व अज्ञात असलेल्या भविष्यकाळाची चिंता माणसाला वर्तमानकाळ सुखाने जगु देत नाही.
जे नशिबात असते तेच घडते आणि नशीब हे आपल्या कर्मावरती अवलंबून आहे म्हणून भविष्याची चिंता न करता उत्तम कर्म करावे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!