जन्माचे सार्थक करावे… – मनाचे श्लोक भाग १३

0 193

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ 13 ॥

अर्थ: हे मना, रावणाचे काय झाले ते सांग बरे. त्याचे राज्य, सर्वस्व अचानक नामशेष झाले. म्हणून तू तातडीने देहविचार, विषयोपभोगाची वासना सोडून दे. कारण काळ तुझा पाठलाग करत कधी तुला गाठेल ते कळणार देखील नाही.
तपःसाधनेच्या कालावधीमध्ये समर्थ रामदास स्वामी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्‍चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले.
समर्थ म्हणतात एवढा मोठा रावण जो बलिष्ठ होता, कमालीच्या श्रीमंत अशा लंकाद्वीपाचा राजा होता, विद्वान होता, शंकराचा भक्तही होता त्याचं काय झालं? राज्य बुडालं, भाऊ, बहीण, मुलं सगळे मारले गेले आणि स्वत: तोदेखील मारला गेला. असा सर्वनाश का व्हावा त्याचा? केवळ गर्व, सूडबुद्धी आणि तीतून निर्माण झालेली देहबुद्धी-विषयवासना जोपासल्यामुळंच. शूर्पणखेच्या विद्रूप होण्यामधून सूड म्हणून सीतेला पळवून आणले आणि तिची अभिलाषा धरली.
रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसर्‍या कुणाचे असेल असे वाटत नाही.
अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते.
त्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक (परस्त्रीहरणाचे) वाईट कृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे. ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली.
याजसाटी केला होता अट्टाहास ।शेवटचा दिस गोड व्हावा ॥
आता निश्‍चिंतीने पावलो विसावा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥
संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात… त्यांनी जो सर्व अट्टाहास केला तो यासाठी होता कि आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या अंती समाधान असावे. अपूर्ण इच्छा, मृत्यूचे भय इ. काही नसावे.
मनात कुठलीही तृष्णा नसणे, समाधान आणि आनंद असणे हेच भगवत्प्राप्तीचे लक्षण आहे. माणसाच्या गरजा फार थोड्या असतात. त्या पुर्‍या होणं सहज शक्य असतं. त्यात काही अडचण नसते. सगळयांच्या गरजा पुर्‍या होऊ शकतात. वासना, अपेक्षा मात्र पुर्‍या होऊ शकत नाहीत.
ज्याशिवाय जगणं अशक्य असतं ती गरज. वासनेचा आपल्या जगण्याला काहीच उपयोग नसतो. तिच्यामुळे एकच कार्य घडतं. ती अहंकार निर्माण करते आणि वाढवते.
म्हणून हे मना, तातडीने, वेळ न दवडता विषयवासना सोडून द्यायला हवी कारण ती राहील तर काळाच्या पोटी सर्वनाश दडलेला आहे आणि तो व्हायला वेळ लागत नाही.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!