भक्त कैवारी – श्रीराम – मनाचे श्‍लोक (भाग 35)

0 223

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तयां अंतरी देव तैसा ॥
अनान्यास रक्शितासे चापपाणि।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥35॥
अर्थ: मनात जशी कल्पना केली असेल तसाच देव तिथे वसत असतो. त्या देवाशी एकरूप झालेल्याच्या रक्षणासाठी तो धनुर्धारी राम उभा असतो. तो आपल्या सेवकाची, भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही.

समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन् त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

pune lok1

समर्थ रामदास या श्लोकातुन असे म्हणतात…
जसा भाव आपल्या मनात असतो त्याप्रमाणे आपल्याला देव तसा भासतो. परमेश्‍वराच्या रूपाची जशी कल्पना केली जाते तसे रूप आपल्या समोर दिसते. कारण आपल्या मन बुध्दीवर त्याचाच अमल असतो. मग मनात येइल ती कल्पना करण्यापेक्षा… काहीतरी पौराणिक आधाराने ती कल्पना केलेली छान असते. ती कल्पना सुध्दा विवेक पूर्ण असायला हवी कारण समर्थ म्हणतात :विवेके वीण जो भाव तो अभाव…
मनाला आनन्द देणारे रूप मन एकाग्र करते व मन त्या मूर्ती वर स्थिरावते. त्याने परमेश्‍वर रूपाबद्दल भक्ती उत्पन्न व्हायला मदत होते. जसे रूप आपल्या भावने प्रमाणे आपल्याला दिसते तसा आपला भाव जसा असतो तसे मग नाते ईश्‍वराशी तयार होत जाते.
आपल्या नियमित भक्तिने ईश्‍वराशी… बन्धू ,माता ,पिता ,सखा अशी अनेक प्रकारची नाती तयार होतात. अर्जुनाने श्रीकृष्णा बरोबर सख्यत्वाचे नाते जोपासले, द्रौपदी त्याला बन्धू मानत होती, देवकी त्याच्यावर पुत्रा प्रमाणे प्रेम करत होती, असा सर्व जगाला व्यापणारा हा परमेश्‍वर भक्तानी पुजलेल्या भावाप्रमाणे प्रत्येकाला दिसला. तसाच तो आपल्यालाही दिसेल.
याकरता फक्त एक महत्वाची गोष्ट हवी. त्याच्याशी अनन्यता ! अनन्यता म्हणजे न अन्य असा भाव… भक्त जेव्हा स्वत:ला ईश्‍वरा पासून वेगळे मानत नाही ,तेव्हा तो अनन्य होतो. भक्त मानतो की परमेश्‍वराची ईच्छा तीच त्याची ईच्छा ! तो स्वत: कोणतीही गोष्ट करत नाही तर परमेश्‍वर त्याच्या कडून करवून घेतो आहे.माणसाच्या मनामधे असणार्‍या असंख्य भावभावनांची अभिव्यक्ति एका एका देवस्वरूपात व्यक्त होते .जसे ,पुत्र वत्सल मातेला बाळकृष्ण पूजावा असे वाटेल. बलौपासना करणारा हनुमंताची पूजा करेल ,वैराग्य मिळवण्यासाठी शिवाची उपासना आणि भवसागर पार करण्यासाठी रामराया . म्हणून ‘भाव तैसा देव ‘
अनन्याश्‍चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ 9-22 ॥
’योगक्षेमं वहाम्यहम’ ही भगवंताची प्रतिज्ञा आपण पाठ करतो पण हा श्‍लोकाचा चवथा चरण आहे आणि पहिल्या तीन चरणात मी कोणाचा योगक्षेम वाहतो हे स्पष्टपणे सांगितले आहे. जो ईश्‍वराचे अनन्यभावाने चिंतन करतो, सर्व प्रकारे सेवा करतो आणि ज्याचे अंत:करण ईश्‍वराशी निरंतर संलग्न असते त्यांचा भार ईश्‍वर नक्की शिरी घेतो असे गीतेत सांगितले आहे.
मग भक्ताची अशी श्रद्धा एकदा दृढ़ झाली की ,
‘अनन्यास ‘मधे दोन अर्थ होतात ,
अनन्य शरण आलेला आणि ज्याला अन्य कोणी नाही म्हणजे सांभाळ करणारे .
तर अशा दोघांनाही रक्षीतसे प्रभु राम.
समर्थ सांगत आहेत…
तुझा राम तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!