मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

0 183

शब्दराज ऑनलाईन,दि 08 ः
केंद्रीय मंत्रिपद मिळताच फॉर्मात आलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेवर डागलेल्या तोफा… राणेंना झालेली अटक… शिवसैनिकांची आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोपानंतर आता राज्यात आणखी एक राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
निमित्त असेल सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन. येत्या ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे व राणे हे एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळं या कार्यक्रमाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून चिपी विमानतळ सुरू होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळं उद्घाटनाची तारीख लांबत गेली. अखेर आता उद्घाटनाला मुहूर्त गवसला आहे. विमानतळाच्या उभारणीवरून शिवसेना व भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. आपल्याच प्रयत्नामुळं हे विमानतळ सुरू होतंय असा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे. तसंच, एकमेकांचे दावे खोडूनही काढले जात आहेत. हे विमानतळ केंद्र सरकारचे की महाराष्ट्र सरकारचे इथपर्यंत दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे.
विकासकामाच्या निमित्तानं कट्टर राजकीय वैरी एकाच व्यासपीठावर आल्याची अनेक उदारहणं आहेत. इतर वेळी एकमेकांवर तुटून पडणाऱ्या नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. राजकीय जुगलबंदी, एकमेकांना टोमणे आणि चिमटेही काढण्याचेही प्रसंग घडले आहेत. त्यामुळंच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे नेमके काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

error: Content is protected !!