श्रेष्ठ करा …मनुष्य जन्म – मनाचे श्‍लोक (भाग 14)

0 83

जिवा कर्म योगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळ मुखी निमाला
महा थोर ते मृत्यू पंथेची गेले
किती एक ते जन्मले आणि मेले ॥14॥

अर्थ: कर्मयोग आचरणात आणल्यामुळे प्राण्याला मनुष्यजन्म प्राप्त झाला तरी शेवटी तो काळाचा घास होतोच. किती तरी थोर माणसे मरणाच्या वाटेने गेली. आणि सामान्यजन सुद्धा किती जन्मले आणि मेले त्याची गणतीच नाही.
वयाच्या 12 व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्षे तपश्‍चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. 1621 ते 1633 असे 12 वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे.
समर्थ रामदास स्वामींनी या श्‍लोकामध्ये मानवी जीवनाचं महत्व समजावून सांगितलं आहे. आपल्या पुराणांमध्ये लिहिलेले आहे कि या ब्रह्मांडामध्ये चौर्यांशी लक्ष जीव योनी आहे, त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णवहजार नवशे नव्याण्णव जीव योनिनंतर, मानवी जन्म प्राप्त होतो. फक्त याच जन्मामध्ये हा प्राणी आपल्या इंद्रियांचा वापर करून कर्म करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो, इत्यादी.

विवेकाने विचार केला तर समजेल कि फक्त मानवप्राणीच उत्तम भक्ती करू शकतो. या इंद्रियांचा वापर उत्तम कार्य करण्यासाठी करू शकतो, हात जोडून वंदन करू शकतो, डोळ्यांनी उत्तम पाहू शकतो ग्रंथ वाचू शकतो, उत्तम काव्य लिहू शकतो, वाचेने उत्तम बोलू शकतो.असा हा मानवी जन्म काही कार्यकारण आपल्याला लाभलेला आहे, याची सर्वदा जाणिव ठेवावी.

कबीरजी म्हणतात,
चाह गई, चिंता मिटी
मनवा बेपरवाह
जाको कछु न चाहिए
वो शाहन का शाह॥
समाधान ही खरी तर आत्म्याची शालीनता आहे.
म्हणून मानवी जन्मात येऊन आज्ञेप्रमाणे उत्तम कर्म करून, भक्ती करून मोक्ष मिळवून या जन्म मरणाच्या फेर्‍यातून बाहेर पाडण्यासाठी हा मानवी जन्म प्राप्त झाला आहे असे परमसत्य समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात.
सजीवतेचा नाश म्हणजे मृत्यू.

शरीरातील जीवात्मा हा प्राण-वासना-मन या कोशांसकट जोडलेला असतो. प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे.
श्‍लोक 19, भगवत गीता (अध्याय 3)
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ 3-19 ॥
अर्थ:
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ॥ 3-19 ॥
धर्मशास्त्रात, विशेषत: वेदांमध्ये, विहित असलेली कर्मे हीच युक्त कर्मे होत, असे वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेले आहे. या अर्थामध्ये भगवद्गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला. युक्त कर्मे फलाची आसक्ती सोडून आणि लाभ-अलाभ, सुख-दुःख, राग-द्वेष, सिद्धी-असिद्धी, जय-पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत करीत राहणे म्हणजे कर्मयोग होय, असा भगवद्गीतेचा अभिप्राय आहे.
कितीतरी लोक या पृथ्वीवरती जन्माला येतात, लहान मोठे, श्रीमंत गरीब, इत्यादी पण शेवटी मृत्यू हा अटळ आहे, तो प्रत्येकाला येतच असतो, या जन्म आणि मृत्यूमधील अंतर म्हणजेच जीवन जे मोक्षप्राप्तीसाठी उत्तम कर्माने पार पडायला हवे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!