खळबळजनक! रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस

3 666

रायगड, 30 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. तसंच अनेक सर्वेंमधून अशी बाब समोर आली आहे की मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अशी भयावह परिस्थिती असताना रायगड जिल्ह्यातून) आरोग्य यंत्रणेतील गलथान कारभार समोर आहे. कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची  रायगडमध्ये 28 एप्रिल रोजी आलेली कोविफॉरची HCL21013 ही बॅच खराब निघाली आहे.

रेमेडेसिव्हीरचा तुटवडा संपूर्ण देशामध्ये जाणवत आहे. अशा परिस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यात आलेली रेमडेसिव्हीर इंजेक्शनची संपूर्ण बॅचच दुषित निघाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात 120 कोरोना रुग्णांना या बॅचचे इंजेक्शन देण्यात आले होते. यापैकी 90 जणांना याचे दुष्परिणाम जाणवू ) लागले होते. त्यावर डॉक्टरांनी त्वरित या रुग्णांवर उपचार करून त्यांना सुस्थितीत आणले आहे. परिणामी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने त्या बॅचच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्याबाबतचे आदेश जिल्ह्यातील रुग्णालयाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून या इंजेक्शनचा पुरवठा रायगड जिल्ह्यात केला जात होता. या घटनेनंतर या कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने दिले आहेत. कोविफोर नावाच्या इंजेक्शनच्या HCL21013 बॅचचा वापर न करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

रेमडेसिव्हीरसाठी लांबच लांब रांगा, रेमेडेसिव्हीरचा काळाबाजार इ. अशा घटना आपण गेले काही दिवस पाहत होतो. मात्र आता यात आणखी एका घटनेची भर पडल्याने काळजी वाढली आहे. रुग्णांना देण्यात आलेलं औषधच अशाप्रकारे घातक ठरलं तर त्यांनी बरं होण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!