नवरात्रोत्सव

1 223

अनादी काळापासून चालत आलेल्या शक्ती उपासनेचा उपलब्ध इतिहास जगातील सर्वात प्राचीन ग्रंथात अर्थात ऋग्वेदात आढळतो. शक्तीची स्तुती तेथेही केलेली आहे. सर्व देवांना प्रेरणास्थान असलेली, आसुरी शक्तीचे निर्दालन करणारी, सर्व देवांच्या अंशाच्या एकत्रीकरणातून प्रकट झालेली ही शक्ती व तिचा उत्सव म्हणजे जणू चैतन्याचे जागरंणच.

अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. नवरात्रात नित्य दुर्गापूजा केली जाते, तीही विधीवत. या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात. शरद ऋतूत येत असल्याने हे शारदीय नवरात्र ठरते. देवीची आराधना विशेषतः वर्षातून दोन वेळा केली जाते. वसंत ऋतूतील वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत तर शारदीय नवरात्र अश्‍विन मासातील शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत असते. हे शारदीय नवरात्र शाक्तपंथीय मानले जाते. दुर्गा देवतेचे महत्व भविष्यपुराणातही कथन केलेले आहे. अश्‍विन मासी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रात नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे. पहिली माळ शेवंती, सोनचाफा यासारख्या पिवळ्या फुलांची; दुसरी माळ अनंत, मोगरा, चमेली या फुलां सारख्या पांढर्‍या फुलांची; तिसरी माळ गोकर्णासारख्या निळ्या फुलांची अथवा कृष्ण कमळांची; चौथी माळ केशरी अथवा भगव्या फुलांची,ज्यात अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले येतात; पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची; सहावी माळ कर्दळीच्या फुलांची; सातवी माळ झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची; आठवी माळ तांबड्या फुलांची जसे कमळ ,जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची तर नवव्या दिवशी कुंकुमार्चन करून विड्याच्या पानांची माळही वाहतात.

सर्व देवांच्या ठायी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरुपी मूर्तीला तिच्या तेजामुळे देवी असे म्हटले गेले. शाक्त संप्रदायाने तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. या देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात . त्यातल्या सौम्य रूपाला उमा, गौरी पार्वती, जगदंबा , भवानी अशी नावे असून दुर्गा, काली , चंडी, भैरवी , चामुंडा, ही तिची उग्र रूपे आहेत. नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ती पुढीलप्रमाणे –

प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी !
तृतीयं चंद्रघंटेति कूष्मांडेति चतुर्थकम् !!
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च !
सप्तमं कालरात्रिश्‍च महागौरीति चाष्टमम् !!
नवमं सिध्दिदां प्रोक्ता नवदुर्गा: प्रकीर्तिता !
उक्तान्येतानि नामानि ब्राह्मणा एव महात्मना!!

मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य सांगितले आहे की, शरद ऋतूतील वार्षिक महापूजेचे देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास व्यक्ती सर्व बंधनांपासून मुक्त होते तसेच धनधान्याने संपन्न होते.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असल्याने नवीन शक्ती, उत्साह, उमेद यावेळी निर्माण होते. ज्योतिष शास्त्रीय ग्रंथ बृहत्संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांच्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्यांच्या आरोग्य आणि व्यवहारावर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ असल्याने ब्रह्मचर्य, उपासना, यज्ञ असे केल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच शिवाय स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकासही होतो .म्हणूनच नवरात्र शारीरिक तसेच आत्मिक शुद्धीचा काळ मानला जातो. नवरात्रीत कायाकल्प होतो म्हणून या कालावधीत उपवास, ध्यान, प्रार्थना आणि इतर आध्यात्मिक पद्धतींना महत्त्व असते. मनाला प्रचंड शांती लाभण्याचा हा काळ असतो. या काळात सकारात्मकतेचा संचार होऊन आपल्यातले आलस्य, क्रोध , अत्याचार, गर्विष्ठपणा इत्यादी वाईट भावनांचा लोप होतो.
शक्तीची मुख्यत्वे तीन स्वरूपं असतात ती म्हणजे दुर्गा , लक्ष्मी आणि सरस्वती. दुर्गा ही संरक्षक देवी असून लक्ष्मी संपदेची, ऐश्‍वर्याची तर सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. नवरात्रोत्सवात या तिन्ही रूपांची मनोभावे पूजा केली जाते. दुर्गा देवी ही नकारात्मकता कमी करून जय प्रदान करते म्हणून तिला जयदुर्गा असे म्हटले जाते. लाल रंग तिला प्रिय असतो, जो गतिशीलतेचा रंग आहे. महिषासुरमर्दिनी म्हणजे ती आपल्यामधले म्हशीसारखे आळसावलेपण, सुस्तावलेपण, जडत्व नष्ट करते ; जे आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीत अडथळा ठरत असते. देवी म्हणजे निव्वळ सकारात्मक ऊर्जा. लक्ष्मी रूपातील देवी समृद्धी , जगण्याला आवश्यक ते सर्व भौतिक ऐश्‍वर्य प्रदान करते ; ज्यामुळे व्यक्तीचे भौतिक व आध्यात्मिक असे दोन्ही कल्याण साधले जाते. ही लक्ष्मी आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी , धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी अशा स्वरूपात ऐश्‍वर्याची बरसात करते. तर सरस्वतीरूपातील ही देवी खडका सारख्या दृढ ज्ञानाला, वीणेच्या शांत स्वरांनी झंकारून विश्रांती आणि उत्साह आणते. विविध प्रकारच्या ज्ञानामुळे मानवी चेतना प्रकाशित होतात. अज्ञानातून मुक्ती मिळते आणि प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते. मग सहजच आपल्या मनातून प्रार्थना उमटते-
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणी नमोस्तुते ॥

(लेखाचे सर्व हक्क सुरक्षित असून संपादकांच्या व लेखिकेच्या परवानगीशिवाय कुणीही मजकूर घेवू नये.)
* * * * *

error: Content is protected !!