पुरूषोत्तमाच्या उत्तर पुजेने अधिकमासाची सांगता ! माजलगांवातील जगप्रसिद्ध मंदिर

1 130

• देशातील एकमेव पुरुषोत्तमाची मंदिर माजलगांवात
• भाविकांना दर्शनासाठी तीन वर्षे करावी लागणार प्रतीक्षा
• कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द . अनेकांचा रोजगार बुडाला
माजलगांव, धनंजय माने – तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. या ठिकाणी अधिकमासानिमित्त महिनाभर यात्रोत्सव असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला. शुक्रवारी ( दि.१६ ) तहसिलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते अधिकमासाची उत्तर पुजेने सांगता झाली. मंदिर बंद असल्याने महिनाभर याठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला तर यात्रोत्सव रद्द असल्याने अनेक व्यापाऱ्यांचा मोठा रोजगार बुडाला आहे.

तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. विष्णूचा अवतार म्हणून भगवान पुरूषोत्तमाची पूजा केली जाते. अधिकमासात पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी देश , राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात . मंदिर सुरू होणार की नाही ? या प्रतिक्षेतच अधिकमासाचा पुर्ण महिना संपला . परंतु शासनाचा मात्र निर्णय झाला नाही . मंदिर समितीने शासनाने घालुन दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत संपुर्ण महिना मंदिर बंद ठेवले . तर सुरूवातीलाच यात्रा , उत्सव रद्द केल्याची घोषणा केली होती . अधिकमासामध्ये याठिकाणी तब्बल महिनाभर मोठी यात्रा असते . तर परिसरातील २५ ते ३० गावातील व्यापारी अर्थार्जन करण्याकरीता याठिकाणी महिणाभरासाठी दुकाने लावतात . परंतु कोरोनामुळे यात्रा , उत्सव रद्द झाल्याने ना याठिकाणी दुकाने सजली , ना यात्रा भरली . भाविकांसह ग्रामस्थांचा देखिल मोठा हिरमोड झाला .

यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे पुरूषोत्तम मंदिराच्या पायथ्याशी असलेली गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे . परंतु भाविकांना या पाण्यामध्ये स्नान करभगवान पुरूषोत्तमाच्या दर्शनाचा लाभ घेता आला नाही . आता पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे . शुक्रवारी तहसिलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते अधिकमासाची उत्तर पुजेने सांगता झाली . यावेळी सरपंच अशोक धिरडे , उत्तमराव गोळेकर , उपाध्यक्ष विजय गोळेकर , बाबासाहेब गोळेकर , रामप्रसाद गोळेकर , भाउसाहेब गोळेकर यांची उपस्थिती होती.

कोरोनाने हिरावला मंदिर समितीचा निधी प्रत्येक तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात पुरूषोत्तमपुरी येथे भाविकांची मांदियाळी असते . देशभरातून येणारे भाविक सोन्या – चांदीच्या धोंड्यासह मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी भगवान पुरूषोत्तमाच्या चरणी अर्पण करतात . यातुन मंदिर समितीला मोठे आर्थिक उत्पन्न मिळते व या उत्पन्नातुन मंदिर परिसरातील विकासकामे मार्गी लागतात . परंतु कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द झाल्याने या मिळणाऱ्या निधीवर देखिल पाणी फिरले आहे .

शासनाने कोरोनाच्या दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करण्यात आला . भाविकांनी देखिल दर्शनासाठी सहकार्य केल्यामुळे महिनाभराच्या कालावधीमध्ये मंदिर बंद ठेवले . परंतु भगवान पुरूषोत्तमाची दररोज विधीवत पुजा करण्यात येत होती . शुक्रवारी उत्तर पुजेने अधिकमासाची सांगता करण्यात आली . -उत्तमराव गोळेकर , अध्यक्ष मंदिर समिती .

error: Content is protected !!