विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने सुरू केली तयारी, देवेंद्र फडणवीसांवर सोपवली नवी जबाबदारी

0 74

मुंबई,दि 08ः
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी सोपवली आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजपनं 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी आपले प्रभारी घोषित केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये वेगळी जबाबदारी दिली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणार अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. आता भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

येत्या वर्षभरामध्ये देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने आता तयारी सुरू केली आहे. मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांच्या काळात या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपात फेरबदल केले आहेत.

फडणवीसांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेतृत्त्व करणारे देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजपच्या वरिष्ठांनी गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीसांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांनी चांगली कामगिरी केली आहे. 2020 झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 70 पेक्षा जास्त जागा जिंकत संयुक्त जनता दलासह सत्ता कायम ठेवली. यानंतर आता फडणवीस गोव्यातील निवडणुकांमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

तर उतर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रधान यांच्यासोबत अनुराग ठाकूर, अर्जुन मेघावाल, सरोज पांडेय, शोभा कंदरलाजे, कॅप्टन अभिमन्यू, श्रीमती अन्नपूर्ण देवी आणि विवेक ठाकूर यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणूक

उत्तराखंडसाठी भाजपनं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासोबत लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आर. पी. सिंह यांनाही सहप्रभारी बनवण्यात आलं आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर हरदीप पुरी, मिनाक्षी लेखी, विनोद चावडा यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मणिपूर विधानसभा निवडणूक

मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत प्रतिमा भौमिक आणि अशोक सिंघल यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!