हनुमान जयंती…

0 298

भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥
महाकाय असणारा मारुती शंकराचा रुद्राचा अवतार असल्याने महारुद्र असा उल्लेख आला आहे. सूर्याचा ग्रास करण्यासाठी उड्डाण केलेल्या हनुमंताला इंद्राने वज्र फेकून मारले त्या आघाताने त्याची हनुवटी तुटली म्हणून हा हनुमान…
समर्थ रामदासस्वामी लिखित भीमरूपी स्तोत्र हे मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे, त्याच्या गुणविशेषांचे वर्णन करणारे आहे. अत्यंत प्रासादिक अशी ही रचना आहे. समर्थाचे हे स्तोत्र एक उर्जेचा स्रोत आहे.
शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या महापराक्रमी आणि एक निष्ठावंत , प्रभू श्रीरामाचे निष्ठावंत, आदर्श भक्त म्हणजेच हनुमान.
प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय!
हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्यांची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो. तंत्रात त्याला स्थान आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे आज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जात आहे.
भारतात यंदाही सलग दुसर्या वर्षी हनुमान जयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने सार्वजनिक वावराला बंधने आहेत. म्हणुन हा सण देखील घरातच राहून साजरा करायचा आहे.
चैत्र पौर्णिमेला सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या
दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
गुळ फुटाण्याचा प्रसाद यावेळी वाटला जातो. हनुमान जयंतीला ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण केले जाते. मोठमोठे भंडारे या दरम्यान आयोजित करण्यात येतात.
हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अश्या अनेक नावाने संबोधले जाते. त्याचे शस्त्र गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पध्दत केवळ महाराष्ट्रातच आढळते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुलं पानं अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच्यासमोर नारळ देखील फोडला जातो.
वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता.
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला.
लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सुर्याकडे आकर्षीत होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाने सुर्याकडे कुच केले. इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले.
इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मुर्छीत झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले. त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मुर्छीतेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत होऊन सुरवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले, तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या. एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्यांनी त्याला शाप दिला ’तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल’.
पुढे श्री राम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली.
रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ नारद मुनींनी आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली.
हनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे.
बुद्धी व शक्तीचा संगम
हनुमान शक्ती, सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसाद केल्या. वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली. वेद, उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. म्हणूनच राम-लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते. तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमाला पाठवण्यात आले होते. तसेच समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, त्यातून वायूपुत्र मारुती तेजतत्त्वाला जिंकणारा होता, हे लक्षात येते.
मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाल्या, श्रीरामांचे आयुष्य वाढावे; म्हणून मी शेंदूर लावते. मारुतीराया रामांचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभु श्रीरामांना समजल्यावर ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, मारुतीराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे.
हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर लावतात आणि तेल वाहतात.
समर्थ रामदास स्वामिंनी मारूती स्तोत्र लिहीले व महाराष्ट्रात शक्तीची उपासना करण्यास सुरूवात केली. लोकजागृती करून प्रत्येक गावाबाहेर मारूतीचे देऊळ स्थापन केले.
समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारूतीरायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात.
मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात दरम्यान अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
हनुमानाला भगवान महादेवाचा अवतार देखील मानला जातो. कलियुगात संकटाचे हरण करणारा म्हणुन एकमेव हनुमंत असल्याचे देखील मानले जाते.
हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये॥
अर्थ: मनोवेगाने जाणारा, वार्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धीमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपति आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे.

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान . . .
एक मुखाने बोला , बोला जय जय हनुमान . .
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!