नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू,शिवसेनेवर टीकास्त्र

0 55

शब्दराज ऑनलाईन,दि 27 ः
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी नारायण राणे यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी अनेक जुन्या विषयांना हात घालून माझ्या वाटेला जाऊ नका असा इशारा देखील दिला आहे.

नारायण राणे यांनी यावेळी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा दाखला दिला आहे. नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात प्रश्न निर्माण झाला आहे. ते म्हणाले की, कसले भाषणं करता, माझा घसा ठिक होऊ द्या, मग मी सोडणार नाही. काय करायचे ते करा. जुन्या गोष्टी काढत आहेत, काढा ना. आम्हाला देखील जुन्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याच बंधुंच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अॅसिड फेकायला कोणी कोणाला सांगितले? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार आहे’ असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार
पुढे बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा देत म्हटले की, ‘सुशांत सिंह राजपूतची केस अद्याप संपलेली नाही. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हाला देखील आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवले आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार’ असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.

पुन्हा सुरू केली जन आशीर्वाद यात्रा
नारायण राणे यांनी 19 ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. मात्र या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते यामुळे ते वादात सापडले. यानंतर भाजप- शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणेंना अटक झाली नंतर जामिनावर त्यांची सुटका देखील झाली. या संपूर्ण प्रकरणानंतर राणे यांनी पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!