हरितालिका तृतीया व्रत…

0 19

आज हरतालिका तृतीया… भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते.
चातुर्मासातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात, ते गणपतीचे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते. मात्र, त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. ’हरतालिका’ व ‘हरितालीका’ असे दोनही शब्दप्रयोग रूढ आहेत.
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्‍चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला ’हरितालिका ’ असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. शिवा भूत्वा शिवां यजेत् । या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.
हर हे शिवचे नाव आहे. त्यामुळे या व्रताला हरितालिका तृतीया असं म्हटलं जातं. खर्‍या अर्थाने हा उपवास आपल्याला हवा तसा किंवा योग्य पती मिळावा या उद्देशाने केला जातो.
हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते.
शिवपार्वती किंवा उमा महेश्‍वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्‍वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची.
हरितालिकेची पौराणिक कथा
पौराणिक अख्यायिकेनुसार, हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली आणि नारदाच्या सांगण्यावरून पर्वतराजाने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचे ठरवले. मात्र पार्वतीच्या मनात भगवान शंकर असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला. तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन असे तिने सांगितले. तसेच आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली आणि शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन कठोर तपस्या केली. सलग 12 वर्षे पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
पूजा विधी-
वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. संकल्प, सोळा उपचार पूजन, सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.
हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवस उपास करण्याची प्रथा आहे. काही महिला निर्जळी उपास करतात. कुमारिका चांगला पती मिळावा; तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, यासाठी हे व्रताचरण करतात. रात्री विविध खेळ खेळून रात्र जागविली जाते. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखविला जातो. यानंतर या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतरच उपास सोडला जातो. याला पारणे असे म्हणतात.
गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचे संकंट असल्याने साधेपणाने घरच्या घरी हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे. यापूर्वी महिला एकत्र येऊन हरतालिका साजर्‍या करायच्या मात्र, यंदा सोशल डिस्टन्सिंग राखूनच आपल्याला हे व्रत साजरं करावं लागणार आहे.
देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा
ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!