दोन्ही कॉंग्रेसमध्ये धुमशान…शरद पवार यांच्या टिकेला नाना पटोलेंच जोरदार प्रत्युत्तर

0 102

शब्दराज ऑनलाईन,दि 10 ः
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. तर, काँग्रेसकडून देखील शरद पवारांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पवारांच्या या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या. त्यांनीच जमीन चोरली, डाका टाकला, अशा शब्दात नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांवर हल्ला चढवलाय
“त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.” असं नाना पटोले  म्हणाले आहेत.

एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काल काँग्रेसच्या सद्यस्थितीचं विश्लेषण केलं होतं. ‘उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या हवेलीसारखी सध्या काँग्रेसची अवस्था आहे. या हवेलीची रया गेली आहे,‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.आजूबाजूचं सगळं शिवार हातातून गेलंय. पण ते स्वीकारण्याची काँग्रेसची मानसिकता नाही. काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळा विचार करायला तयार नाहीत,’ असं पवार यांनी म्हटलं होतं. पवार यांच्या या टीकेला माध्यमातून जोरदार प्रसिद्धी मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!