आहारातून साधलेले आरोग्य हा जीवनाचा पाया : डॉ.मोनिका भेगडे

0 175

आळंदी,दि 15 (प्रतिनिधी)ः
दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राष्ट्रीय पोषण जनजागृती मोहीम अंतर्गत सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी च-होली खुर्द, ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आळंदी शहरातील स्री रोग तज्ञ डॉ.मोनिका भेगडे आणि डाॅ.अपर्णा स्वामी यांचे स्री आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.मोनिका भेगडे म्हणाल्या की अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे.कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.
डाॅ.अपर्णा स्वामी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की
खरं तर पोषण चळवळीचा मुख्य पाया आहे तो संतुलित आहार घेणे.आपण बऱ्याचवेळा पाहतो लोक संतुलित आहार घेत नाहीत.बहुतांशी महिलांना घरात मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळे शेवटी जेवणे, अन्न शिळे खाणे असे प्रकार होतात परिणामत: कुपोषण वाढत असते. फास्ट फुडचे जास्त सेवन केल्याने भविष्यात लठ्ठपणा, हायपरटेंशन, असे आजार होण्याची जास्त शक्यता असते तर कुपोषणामुळे बुटकेपणा, बारिक शरीरयष्टी असणारी मुलं पाहतो जी वारंवार आजारी पडतात. अशा मुलांचा शारीरिक विकास नीट न झाल्याने बौद्धीक विकासही नीट होत नाही. त्यामुळे आपण जे खातो तो आहार संतुलित असला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे कमी खा पण संतुलित खा असाच संदेश यामधून द्यायचा आहे.
या वेळी पर्यवेक्षिका अनिता लांडे,च-होली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काळूराम थोरवे,रवींद्र थोरवे,ग्रामपंचायत सदस्य रामदास घोलप,पांडुरंग थोरवे,अनिकेत कु-हाडे,प्रताप थोरवे,राजकुमार बांगर,गणेश थोरवे,इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,जगत क्लिनिकचे शैलेश सावतडकर,पत्रकार श्रीकांत बोरावके,ज्ञानेश्वर फड,दिनेश कु-हाडे, अंगणवाडी सेविका सारिका थोरवे,आशा सावंत,उज्वला थोरवे,कल्पना थोरवे,मंदाकिनी कुंभार,राजश्री गायकवाड,अंगणवाडी मदतनीस सुलोचना जाधव,सीमा पवार,लतिका पगडे,सिमा केवळ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाअंतर्गत सर्व पोषण आहार जनजागृतीसाठी महिला आणि मुलींची रॅली काढण्यात आली,यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!