तेलंगणमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी मराठमोळे महेश भागवत
तेलंगण सरकारने मराठमोळे अधिकारी महेश भागवत यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरकारने त्यांना पदोन्नती दिली आहे.
हैदराबाद : तेलंगण पोलीस दलात आपल्या कार्यातून छाप पाडणारे रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची तेलंगण राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे आहेत. सध्या ते हैदराबादमधील रचकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात उल्लेखनीय काम केले आहे. मानस्वी तस्करीच्या जाळ्यातून त्यांनी अनेक लहान मुले आणि महिलांची सुटका केली आहे. भागवत यांचा सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय सहभाग राहिला आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या ‘शी टीम’ने अतिशय चांगली कामगिरी आहे. त्यामुळे शहरात महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक राज्यांत स्थलांतरित मजूर अडकले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न बिकट बनला होता. यामुळे लॉकडाउन काळात भागवत हे गरजूंसाठी धावून गेले. त्यांनी अनेक गरजूंना अन्नाचे वाटप केले. याचबरोबर त्यांनी अनेक स्थलांतरीत मजुरांना विविध प्रकारची मदत केली. त्यांच्या या सामाजिक कार्यासोबतच पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत तेलंगण सरकारने त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
महेश भागवत 1995 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. त्यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरींग केले. सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील अनेक अधिकार्यांचे आदर्श ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे नावाजले गेले आहेत. त्यांनी मानवी तस्करीविरूद्ध उभारलेल्या लढ्याची दखल अमेरिकेनेही घेतली आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अॅवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे.