राज्यात शेतकरी,कष्टकऱ्यांची तिसरी आघाडी ? जनतेला मिळणार तिसरा पर्याय

0 208

कैलास चव्हाण
परभणी,दि 08ः
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाले आहेत. सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत. सत्ताधारी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता असतानाच शेतकरी, कामगार व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा हालचालींना वेग दिला आहे.त्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला तर  हा निश्चितच सत्ताधारी आणि विरोधकांना विचार करायला भाग पाडणार आहे.

महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयाराम गयाराम तसेच वाचाळविरांच्या वक्तव्याने दूषित झाले आहे. राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. पिढ्या ना पिढ्या पदे भोगले तरी सत्तेविना कासावीस झालेली मंडळी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. त्यामुळे राजकारणात प्रामाणिकपणा, निष्ठा या शब्दाला किंमत राहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडी अशा दोन्हीकडे तेच नेते आहेत जे वारे पाहून पलटी मारतात. त्यामुळे राज्यातील जनतेला तिसरा पर्याय नसल्याने नाईलाजाने या दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागतो, म्हणून तिसऱ्या आघाडीची राज्यात गरज असल्याची आपेक्षा व्यक्त होऊ लागताच तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शेतकरी  नेत्यांनी आपली कंबर कसली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नेहमीच रस्त्यावर उतरणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वंचित व दिन दुबळ्यासाठी काम करणाऱ्या इतर संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले, त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत आणि कोणत्याही राजकीय नुकसानीची पर्वा न करणारे एकमेव नेते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू हे देखीलसंभाव्य  तिसऱ्या आघाडीत सामील होण्यासाठी चाचपणी करत  आहेत.दिव्यांगांच्या प्रश्नांवर कल्पकतेने आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी बच्चु कडू प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडीच्या काळात मंत्री देखील होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर ते शिंदे सोबत गेले परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही आता ते देखील तिसरी आघाडी मजबुत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर युवकांचे  संघटन उभे करणारे कोल्हापूर राजघराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत.त्यासोबतच दी  बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांची देखील तिसऱ्या आघाडीला साथ लाभत आहे. शेतकरी संघटनेचे विर्दभातील प्रमुख जेष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप,मराठवाड्यातून भारत राष्ट्र समितीचे नेते  माजी आमदार  शंकरअण्णा धोंडगे यासारखी जुनी संघटनेच्या चळवळीतील मातब्बर मंडळी देखील शेट्टी यांना मिळाली आहेत.भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे हे देखील येत आहेत. परभणी जिल्ह्यात  संभाव्य तिसऱ्या आघाडीचे नेते एकत्र सोमवार  दिनांक नऊ सप्टेंबर रोजी  आपला दौरा करणार आहेत, या दौऱ्यात ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.राजु शेट्टी,बच्चु कडु यांची राज्यात मोठी ताकद आहे.त्यांना राज्यातील इतर संघटनाची लाभत असलेली सकारात्मक साथ पाहता  एकूणच संभाव्य तिसरी आघाडी दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत या आघाडीत आणखी कोण येते याची उत्सुकता लागली आहे.

error: Content is protected !!