मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट..मोठ्या नावावर शिक्कामोर्तब ?
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना मुख्यमंत्रिपदाच्या २ फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चाही झाली. यातील पहिल्या फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयला होकार दिला आहे. भाजपामधल्या दोन उच्चपदस्थांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.
मात्र महायुतीत भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या असल्याने पुढील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे, अशी भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.