सिंगापूरहून पुण्यात आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन अलर्ट

0 153

पुणे – पुण्यात सिंगापूरहून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन पुणे मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी केलं आहे.

 

पुणे विमानतळार करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

 

“चिंता करण्याची गरज नाही. गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितलं की “ती ३२ वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नाही आहे. त्यांना सध्या घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे”.

 

परदेशात रुग्णांची संख्या लक्षात घेता या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी, त्याचप्रमाणे यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रशासन मागील काही दिवसांपासून कामाला लागलं आहे.

 

 

कोरोनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्स समितीची काल (28 डिसेंबर) बैठक घेण्यात आली आहे. सध्या चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणि पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजन राबवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे.

error: Content is protected !!