माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली मागून धडक

0 33

राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला व पाठीला इजा झाली असून त्यांच्यावर अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी दीपक सावंत जात होते. दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली. यात सावंत यांच्या पाठीला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरनं जबर धडक दिली आहे. यामध्ये डंपरच्या धडकेने गाडीच्या मागील बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच रस्त्याने जाणाऱ्या-नागरिकांनी थांबून मदत सुरू केली होती. रुग्णवाहिका बोलावून डॉ. दीपक सावंत यांना उपचारासाठी अंधेरीच्या दिशेने रवाना केले होते.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमीरा पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला ताब्यात घेतले आहे. तर सावंत हे स्वतःच रुग्णावाहिकेने प्रवास करून अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या वाहनांचा अपघात होण्याची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार जयकुमार गोरे, योगेश कदम, बाळासाहेब थोरात यांच्या वाहनाला अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहे.

तर स्व. विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करू नये असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केले होते.एकूणच काय तर अपघाताच्या नंतर घातपात झाल्याची शक्यताही वर्तवली जाते, तर्क वितर्क लावून चौकशीची मागणी केली जाते, डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीची स्थिती बघितली तर गंभीर आहे त्यामुळे घातपाताचा संशय बळावला जात आहे.

error: Content is protected !!