तुका म्हणे :: व्यसनाधीनता (भाग १२)

0 235

 

एकदा परभणीवरून पुण्याला प्रवासासाठी निघालो होतो. बसमध्ये बाजूला एक साठ वर्षांचे ग्रहस्थ होते. रात्री दीडच्या सुमारास बस एका धाब्यावर थांबली. आम्ही दोघेही थोडे पाय मोकळे करावे म्हणून खाली उतरलो. बाजूलाच एका पान टपरीवर नुकतेच मिसरूड फुटलेली विशितील तीन मुले गप्पांमध्ये दंग होती. त्यातील दोघेजण सिगारेटचा धूर काढत आपल्या तिसऱ्या मित्राला म्हणत होते ” जस्ट चिल यार एक कश हो जाये, आपना हिरो तो येहीच स्टाईल मे पिता है “. बाजूलाच उभ्या असलेल्या बाबांना काही रहावेना ते त्यांना उद्देशून म्हणायला लागले

तुका म्हणे
सेवी भांग आफू तंबाखू उदंड ! परी तो अखंड भ्रांतीमाजी !!
तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला ! त्यासी अंतरला पांडुरंग !!

मी त्यांना ओवीचा अर्थ विचारला, ते म्हणाले माणसांना तंबाखू, आफु, भांग पुष्कळ प्रमाणात सेवन करणे चांगले वाटते आणि त्याच गुंगीत ते नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य सर्वस्वाने बुडाला आणि त्याला पांडुरंग अंतरला आहे. म्हणजे असे मनुष्य सर्वांगाने आपला विकास खुंटून घेतात व सर्व स्वकीयांना व्यसनापायी दूर करतात.

जगाच्या पाठीवर कोणत्याही देशासमोरील तरुण वर्गातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे व्यसनाधीनता. तुकोबारायांना अनेक शतकापूर्वी या विषयाची दाहकता जाणवली असावी की हा किती मोठा व विदारक विषय होणार आहे. तरुणांना या विषयी काही बोलायला गेल्यास ते हिरो हिरोईन चे दाखले देतात, अमुक अमुक सुपरस्टार सिगारेट पितो, दारू पितो आणि म्हणतात आजच्या काळात स्टेटस जपायचे असेल तर थोडी घ्यावीच लागते …तरुण मंडळींमध्ये अनेक प्रकारचे व्यसने आहेत जसे सिगारेट, तंबाखू , गांजा , गुटखा, दारू, ताडी, आफू, कोकेन, ब्राऊन शुगर, व्हाईटनर , पेट्रोल, फेविबॉण्ड, जिममध्ये स्टेरॉइड, टरमिन ई इंजेक्शन्स अशी अनेक प्रकारचे …

सुरवातीच्या काळात मित्रांसोबत घेतलेला एक घोट, एक झुरका केंव्हा संपूर्ण आयुष्य संपवतो हे बहुतांश लोकांना कळतही नाही. सुरवातीला एखादे वेळी दारू घेणारा व्यक्ती हळू हळू आठवड्यातून तीन-चार वेळा , नंतर रोज अश्याप्रकरे व्यसन वाढत जाते. नंतर मात्र कमी प्रमाणात व्यसन करून जो नशा यावा तो येत नसल्याने त्याचे प्रमाण वाढते यास tolerance म्हणतात. पुढील व्यसनाधीनतेचा टप्पा म्हणजे मानसिक व शारिरीक dependance होय, व्यक्ती पूर्णतः त्या व्यासणावर अवलंबुन राहायला लागतो. त्यास दारू, गांजा, तंबाखू असे कोणतेही व्यसन न भेटल्यास बैचेनी, घबराहत, झोप न येणे अशी लक्षणे यायला लागतात , यास withdrawal ची लक्षणे म्हणतात.

व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम :

१) शारीरिक : कोणतेही व्यसन असो त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतातच. जसे दारूमुळे लिव्हर खराब होणे, आतड्यावर सूज येणे, किडनी , हृदय, मेंदू , नसावर दुष्परिणाम होतात. मात्र सगळेच जण मी काय रोज व्यसन करतो का शरीर खराब व्हायला असे उत्तर देतात. प्रत्येक जण पटवून देण्यात आग्रही असतो की मी फक्त मौज म्हणून किंवा कधी-मधी टेन्शन आले तर व्यसन करतो. व्यसनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे व ते वाढतच जात आहे आणि त्याबाबत कोणीही गांभीर्याने दखल घेत नाही ही चिंतेची बाब..

२) मानसिक : मानसिक आरोग्य खराब होण्यास व्यानाधिनता बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे. व्यसनामुळे आपल्या मेंदूतील जैवरासायनिक बदल होतात व अनेक मानसिक आजार उद्भवतात जसे दारू, गांजा ई व्यसनामुळे होणारे भास व भ्रम तसेच withdrawal psychosis. परंतू व्यसनाकडे सामान्यतः सवय म्हणून पाहिले जाते , मुळात व्यसनाधीनता फक्त सवय नसून, हा एक मानसिक आजार आहे.

३) सामाजिक : व्यसनाधीनतेमुळे अनेक सामाजिक प्रश्न आ करून उभे आहेत. जसे समजतील तरुण वर्गातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण. व्यसन करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी गुन्हे करणे तसेच व्यसनाच्या आहारी जाऊन घरगुती मारामारी, चोऱ्या, खून अश्या प्रकारचे गुन्हे तरुण वर्गात खूप वाढले आहे. तसेच अपघाताचे प्रमाण फक्त व्यसनामुळेच खूप वाढले आहे.
एखाद्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक भान हरवण्यास व्यसन खूप मोठे काम करते. नेहमीच बायकोकडून ऐकिवात येते की व्यसन नाही केले तर देव माणूस अहो हो हे, मात्र व्यसन केल्यावर असुर बनतात, म्हणजेच माणसातील माणुसकी काढणारा घटक म्हणून व्यसन काम करत असते.

४) आर्थिक : आपण खूप उदाहरणे पाहतो, एखाद्या श्रीमंत घराची दयनीय अवस्था करणारा प्रमुख घटक म्हणजे व्यसन. व्यसनाधीन व्यक्तीस काहीही असो व्यसन हवेच, मग त्यासाठी घरातील वस्तू, माल, शेती विकणारे महाभाग ही आपण नेहमीच पाहतो. एक साधे गणित मांडू या, दिवसाला एक व्यक्ती ३०० रू दारू पीत असेल असे गृहीत धरू, म्हणजेच महिन्याला ९,००० रू व वर्षाला १,०८,००० रू फक्त दारू पित असावा. म्हणजे किती मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्या घराला. दुसरी बाब म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीची कार्यक्षमता खूप कमी झालेली असते, बहुतांश वेळा असे व्यक्ती कामच करत नाहीत.

५) कौटुंबिक : कोणत्याही व्यसनामुळे संपूर्ण कुटुंबावर खूप दुरोगामी परिणाम होतात. तुकोबारायांनी जे पांडुरंग अंतरला असे संबोधले ते फक्त देवाला दुरावला असे नसून सर्व घरातील व्यक्तींना, मित्रांना, प्रतिष्ठित व्यक्तींना दुरावला असे असावे. पती-पत्नीतील भांडणे, मुलांच्या संगोपनाकडे एक व्यसनी व्यक्ती संपूर्ण दुर्लक्ष करतो. पुढे जाऊन विचार केल्यास असे दिसते की व्यसन करणाऱ्या घरातील पुढील पिढीही व्यसनात अडकण्याची श्यकता जास्त असते कारण मुले ही मोठ्यांचेच अनुकरण करत असतात. म्हणजेच व्यसनी व्यक्ती कौटुंबिक जबाबदारी घेण्यास असफल ठरतात त्यामुळे अनेक सुखी कुटुंबे व्यसनाने उध्वस्त होतात.

पर्यायाने व्यसनामुळे एक व्यक्ती, एक कुटुंब, त्यांचे स्वकीय , आपला समाज आणि असे अनेक व्यसनी व्यक्तिंमुळे आपल्या देशावर दुरोगामी दुष्परिणाम होत आहेत.

व्यसनाधीनेतून कसे बाहेर पडावे :
१) प्रथमतः व्यसन ही एक सवय नसून हा एक मानसिक आजार आहे हे स्वीकारावे
२) अल्कोहल ॲनॉनिमस या संघटनेचा मुलमंत्र “आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहील” हा पाळावा
३) व्यसनाधीनतेत पूर्णतः अडकलेल्या रुग्णांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधोपचार, समुपदेशन याद्वारे रुग्णांना व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्यास मदत होते.
४) अतिव्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना व्यसनमुक्तीकेंद्रामध्ये ( जसे मुक्तांगण ) ऍडमिट करावे.
५) सर्वात महत्त्वाचे स्वतःची स्वतःला व्यसनमुक्त करण्याची तीव्र इच्छा… यासाठी हवी स्वयंशिस्त , संयमाची जोड आणि कौटुंबिक साथ .
६) सामाजिक बांधिलकी : कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी तसेच हीरो-हीरोइन अश्या ज्यांना तरुण पिढी आयकॉन म्हणून पाहते, त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन व्यसनाधीनतेविरूद्ध लढा द्यावा.

तुकोबारायांनी व्यसनाधीनतेबद्दल आपणास जाण करून दिली होती , ते म्हणाले होते. सेवी भांग आफु तंबाखू उदंड ! परी तो अखंड भ्रांतीमाजी !!

डॉ. जगदिश नाईक
मानसोपचरतज्ज्ञ
मन हॉस्पिटल, परभणी
९४२२१०९२००

error: Content is protected !!