“मनपाचा मागचा गैरव्यवहार जाऊ द्या’’-अतिरिक्त आयुक्त रणजित पाटलांचे धक्कादायक विधान

0 39

परभणी, प्रतिनिधी – परभणी महानगरपालिकेच्या प्रसिध्दी विभागांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून विविध गैरव्यवहार होत असल्याचे पुराव्यानिशी महापालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर बोलतांना त्यांनी मनपाचा मागचा गैरव्यवहार जाऊ द्या, यापुढे सुरळीत करू असे धक्कादायक विधान करतानांच संबंधित कर्मचार्‍याला पाठीशी घातल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मनपाच्या संबंधित विविध तक्रारींचा पाढाच आज पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यापुढे वाचला. यामध्ये संदेश प्रसार धोरण २०१८ नुसार जाहिरातीच्या रोटेशनचे पालन केले जात नाही, साप्ताहिकांना जाहिराती दिल्या जात नाहीत, स्वार्थासाठी एजन्सीमार्फत वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या जातात, प्रसिध्दी विभागात पात्रताधारक तथा सक्षम व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे. मात्र अन्य काम पाहणार्‍या कर्मचार्‍याकडे याचा कार्यभार सोपवल्याने या विभागात अनागोंदी चालली आहे. गुणवत्तापूर्वक बातम्या तसेच माहितीचे प्रसारण होत नाही. महापालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी हा विभाग काम करतो. मात्र संबंधित कर्मचार्‍याचा जनसंपर्क अथवा प्रसिध्दी या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. तसेच त्याचा या संदर्भात अभ्यास नसून त्याच्याकडे कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही. असे असतानाही केवळ वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी सदर कर्मचारी तेथे कार्यरत आहे. त्यामुळे या जागेवर सक्षम शैक्षणिक पात्रता धारक कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकारांनी रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले असले तरी सदर कर्मचार्‍याला मात्र सपशेल पाठिशी घातले. ज्यामुळे महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्‍न निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!