‘परवड’.. वाचनाची भूल पाडणाऱ्या कथा…

0 84

कथाकार बबन आव्हाड यांच्या परवड या कथासंग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.26) परभणीत होत आहे.त्यानिमीत्त कथासंग्रहाचे समीक्षण समीक्षक,शिक्षक अरुण चव्हाळ यांनी केले.त्यांच्या शब्दात…
कष्टातून जीवन फुलवणारी पात्रं…पात्रता निर्माण करून जगणं सरळमार्गी जगणारी माणसं… आपापले अंथरूण पाहून पाय पसरणारी समंजस गुणी माणसं… खटके उडताना खटकेबाज भाषा, कधी लवती घेत एकमेकांना नादर बोलून समजून घेणारी माणसं… कधीमधी इळ्यासारखे वेडीवाकडी वागणारी माणसं… बहुस्वभाव गुणधर्माची माणसं… लोकव्यवहाराचे स्पष्ट शब्द बोलणारे माणसं… बघा तर माचला ‘सगळी जमीन जायदाद बळीच्या नावानं करून देवून बायजामाय दूध ओतून घेतलेल्या रिकाम्या गाडग्यावानी रिकामी झाली होती…’ अर्थातच, बयमान (फितूर) होणारी माणसं… गावच्या कावडफेरीचा-जत्रेच्या परंपरेचा- कुस्तीचा इतिहास घडवणारी माणसं… गावचे ‘गोकुळ’ करणारी माणसं… आडवळणाने जाणारी अन् सरळ होऊन शांतपणे राहणारी माणसं… कच्च्या प्रेमाचे प्वार-पोरगी… व्याजाने बरबटून जगणं परकं करणारी माणसं… सासुरवाशीणीला स्वत:ची भाजीभाकरी खाऊ घालून आपल्या लेकरांसाठी आशीर्वाद मागणारी अन् ‘तुझं पोट भरू दे, लेकरू जगू दे’ म्हणणारी कृपावंत माणसं… दलाली करणारी माणसं… अशी विविधांगी माणसं… ही माणसं दुःखाचे डोंगर पार करून सुखापेक्षा समाधानाची आस आणि शिक्षणाचा-ज्ञानाचा श्वास घेणारी… हे कथेचे मोठे वावर आहे. या वावरात पानापानांवर माणसांचे बहारदार पीक आलेले आहे.
अबब! ही माणसंच माणसं! केवलप्रयोगी अव्ययाने चकित करणारी. स्वतः ग्रामीण टापूत राहून तेथील अनुभव, निरीक्षण, सहवास, बोलीभाषेतून व्यक्त होणारे पहिल्या दमातच समर्थपणे कथाकार असलेले बबन आव्हाड यांचा ‘परवड’ कथासंग्रह वाचताना भेटली. 13 (तेरा) कथा-दुःखाचा डोंगर/भोजाचं लगीन/खळं/ जाबी गाय/ परवड/ सरवा/ बयमान/ सोयरीक/ कावड/ भानगड/ वसुली/ सासरवास/ दलाली/ सलग वाचून काढल्या. कथा साधारणतः आठ ते बावीस पानांच्या आहेत. यातील काही कथा कथासंग्रहाच्या पूर्वी वाचलेल्या, कथाकथनातून-लेखकाच्या तोंडातून ऐकलेल्या आहेत. साहित्य पत्रिकातून-उपक्रमातून वाचनाची आणि ऐकण्याची आवड असणाऱ्यांना बबन आव्हाड हे नाव सुपरिचित आहे. बोलताना ते एकप्रकारे सुटी-सुटी कथाच सांगत असतात. त्यांना जवळून समजून घेताना त्याचा प्रत्यय अनेकवेळा येत असतो. ‘परवड’ कथासंग्रह ‘स्व’, ‘स्वकीय’ आणि ‘सर्व’ या अंगाने बारीकसारीक तपशील घेऊन साकारलेला आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचा ‘आरशाचा तुकडा’ मानायला हरकत नाही. त्यातील भवताल सगळीकडेच समान दिसत असल्यामुळे कुठल्याही ग्रामीण भागात तो देशोदेशीच्या माणसांचा कथासंग्रह वाटावा इतका सर्वमान्य झालेला आहे. कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांनी या कथासंग्रहाची घोषणा बबनरावांच्या ताडलिमला गावच्या रानातच केलेली होती. पिवळ्या-धम्मक ज्वारीतील त्यांचे बोल खरेखुरे ठरलेले आहेत. खरं म्हणजे, ‘परवड’ ची खरी माय इंद्रजित गुरूजीच आहेत. बबनरावांचे पदरचे शब्द आणि त्यांच्या पदरात ‘परवड’ लेकरू टाकण्यासाठी सगळा खटाटोप कवीनेच केला. विद्यार्थ्यावर मायेचा हात फिरवल्यावर बबनराव ‘परवड’ कार झालेले आहेत. संतुक गोलेगावकर यांच्या चित्राने ‘परवड’ ला उच्च दर्जाच्या चित्रकाराचा जीव ओतून न्याय मिळाला. साक्षात प्रकाशन, औरंगाबादच्या माधुरी रमेश राऊत मॅडमने पुस्तकाचे ‘निर्मितीमूल्य’ जपलेले आहे. लेखक-वाचक एकरूप होण्यात शब्द-चित्र-पानं एकजीव असावी लागतात. या पुस्तकाच्या निमित्ताने हा मेळ उत्तम जमलाय. उत्तम वाचक या पुस्तकाला लाभणार!या कथासंग्रहाची पाठराखण कथा कुलाचार्य भास्कर चंदनशिव यांनी केलेली आहे. त्यामुळे वाचनक्षेत्र प्रभावीत होणारे आहे.
‘खळं’ ही कथा साक्षात दिवाळी अंकात (2015) डाॅ. भालचंद्र नेमाडे सरांनी वाचलेली आहे म्हणे, ही नोंद मला दस्तुरखुद्द कथालेखकांनी सांगितलेली आहे. ‘जाणत्या वाचकांचे डोळे कथेला लाभो’ आपलीबी हीच सदिच्छा आहे!! सदिच्छा कृतीवंत-वाचनवंत होण्यासाठी वाचकांपर्यंत कथासंग्रह बऱ्यापैकी पोहोचेलेला आहे. पोहचण्याचा प्रवास सुरूच आहे.
गरीब परिस्थिती, कष्टाचे जगणे, अभावग्रस्ततेतून आलेलं दुःख, माणसांच्या स्वभावाचे फडफडणारे पदर, दुर्गुणांचे फासे, रानातल्या धांदलीचे अस्वस्थ चित्रण, कामाची सावड, मेंढ्या-गाय-बैलांच्या बाबत जपलेली माणुसकी-लळा, चोरीचे-लुटालुटीचे लचांड, सावकाराचे- सासरवासाचे जाळे, कवळ्या प्रेमाचे अर्धेमुर्धे दोरे, परंपरा आणि परिवर्तनाची नांदी अशा असंख्य घडामोडींचे शब्दचित्रण कथाकाराने चितारलेले आहे. यात ‘घडणारी’, ‘बिघडणारी’, ‘कामाची’, ‘संस्काराची’, आणि ‘उधळणारी’ एकूणच मानवी सरमिसळ कथेत दिसते.
बालविवाह आजच्या भाषेत कायद्याने ‘बंदिस्त लग्न’ आहे. पूर्वी सर्रास बालविवाह होत. ‘भोजाचं लगीन’ बालवयातच होणारे असते. तो पळून जातो. नंतर सापडतो. पण लग्नाला हे ‘आपीसी’ (अपयशी) पोरगं नको म्हणून लग्न मोडते. ‘भोजाचं लगीन’ कथामधून आलेलं वर्णन असो वा पुढच्या इतर कथांतून आलेले वर्णनात्मक प्रसंग-कथा विस्तार वाचकांना उकलत जातात. ‘दुःखाचा डोंगर’ कथेत बाबा पाटील नावाचा थोर माणूस भेटतो. त्याचा सालदार गफार आणि पाटील एकमेकांचे जीवन सोबती म्हणून कामे करतात. जुनी माणसे माणसांना कस्तुरीसारखे जपायची. पाटील तसे गफारला जपायचे. पण पाटलाची नवी पिढी आपल्यासाठी जमा करणारी. दु:ख पचवून संयत जीवन सुफल करणारा गफार अधिकच भावतो.
सुधा मूर्ती यांच्या ‘पुण्यभूमी भारत'(मराठी अनुवाद लीना सोहोनी) कथासंग्रहातील ‘सलाम नमस्ते!’ कथेतील शेख महंमद व त्याचे कुटुंब मला आठवले. गफारच्या पात्राप्रमाणेच शेख महंमदचे पात्र आहे.रानात जाताना रानफुलं लक्षवेधी ठरतात, तसे वाचनातून हे संदर्भ लक्षवेधक ठरलेले.
‘खळं’ कथेत ज्वारीच्या खळ्याची कथा खूपच बारीकसारीक तपशीलाने नटलेली आहे. यातील बायांना कणसाची मोडणी झाल्यावर कणसं वटीत घालावे लागतात. मालकाला आणि बायांना मग आयन्यात नावे घ्यावे लागतात. मारोतराव लई झकास नाव घेतात, ‘तुळशीची माळ हाय मह्या गळ्यात, रूखमिनीचं नाव घेतो भरल्या खळ्यात’. त्यावेळी बायाही खुदूखुदू हसतात. ‘खळं’ म्हणजे शेतकऱ्यासकट सर्वांचीच आबादानी. मालकाला माल, कष्टकर्यांना चंदी तर जनावरांना चारापाणी (कडबा) मिळतो. म्हणून सगळे आनंदाचे धनी. लेखकबी शिकताना खळ्यात सामील आहेत. ते हे ‘खळं’ उरकून परीक्षेच्या खळ्यासाठी जातात. म्हणजे एकीकडे जित्राबाचं जगणं अन् दुसरीकडे लेखकाचं शिक्षण खळं महत्वाचे हे कथेतून नजरेत भरते.
‘जाबी गाय’ स्वतः लक्ष्मी आहे. मालक-मालकीणीचीही ‘लक्ष्मी’ ठरलेली आहे. तिने मालकाच्या-मालकीणीच्या पदरात भरभरून दिले. ‘परवड’ कथेत शिक्षणासाठी केलेली वफादारी आहे. ती कथा कथाकाराचीच आहे. शिक्षणाची दुनियादारी करताना स्वत: घेतलेले कष्टं, आई-बापाने-बहिणीने कष्टातून पुरवलेला पै-पैसा आणि ‘शिक्षण घरादाराचा पांग फेडीन’ पाहिलेलं स्वप्न सत्यात साकारते. हे कथेचे मोठे दाणेदार वैशिष्ट्य आहे.
पेताड दामूला कमावणारी/सरवा पाहून, शेळ्या घेऊन वळणारी त्यातून रान विकत घेणारी रखमा बोलते, ‘कव्हा कपाळाला चिटकायला एक रूपया तरी घरी देता का ?’ या प्रश्नाने काळीज चर्र होते. असे अनेक प्रसंग कथासंग्रहात आहेत. ‘सरवा’ कथेतील रखमा एका पोराला मास्तर करते, तर दुसर्याला जवान. शिकलेला नवरा दारूच्या नादातून शेळ्या वळण्याच्या नादाला लावते. माणसांनी नाद करावा तो असा. सरवा म्हणजे पीक काढल्यावर उरीसुरी राहिलेलं धान्य, ते वेचून अर्धालीने मालकाला द्यायचे असते. पण सरवा ‘सर्व धन’ मोलाचे आहे, हे कथेतून जाणवते. ‘नेकीने’ स्वत: जीवन जगावे याचा संदेश ‘बयमान’ कथा देते. मास्तर संजूच्या लग्नाची लांबण ‘सोयरीक’ कथेत आहे.पण त्यात मजेशीर पणा आहे. खानदानीपणा आहे. कथाकाराचा ‘लगीन’ या विषयावरचा इंटरेस्ट अनेकदा कथेत डोकावतो. प्रेमाची थेरं-बिरं अजिबात नाहीत. सगळं काही निर्मळ आहे. ह्या कथेला टाळसरपणा देणार्या गोष्टी. ‘भानगड’ कथेत मात्र कथेतील ‘गीता-राहुल’ सैराट जोडी आहे. मात्र खाल्ल्या भाकरीला जागणारे राहुलचे माय-बाप-भाऊ इमानदारच. कथेतून इमानदारपणा आणि कष्टं अधोरेखित करताना लेखक समाजात चांगुलपणाची पखरण करतो. ‘देणं’ शब्दांच पण लाखमोलाचं!
‘कावड’ गावात फिरवताना झालेले संवाद फारच उच्चप्रतीचे निष्कर्ष मांडणारे आहेत. ते असे-
अरे, गावच्या खालतं होती खारी
खारीत पेरली बघ ज्वारी
पाऊस काही पडंना
ज्वारी काही वाढंना

अरे, गावच्या वरतं होतं बरड
बरडात पेरली खारीक
खारीक झाली बारीक

अरे, गंगकडं होती संवदडी
संवदडीत पेरली साळ
साळ झाली मोळ
संवदडीवाला झाला कोळ

अरे, डोंगराकुन होता मोडा
मोड्यावर बांधला वाडा
वाडा झाला थोडा
दारी बांधावा लागला घोडा

पावसामुळे ज्वारी वाढली नाही.
बरडात(कमी कस असणार्या जमिनीत) खारीक बारीक होते.
संवदडीच्या झाडाजवळ पाणी असते म्हणून साळ पेरली. पण ती मोळ झाली, उतारा आला नाही.
डोंगराकून मोडा म्हणजे वाकडीजागा, तिथे वाडा बांधला, तो लहान झाला म्हणून घोडा दारी(बाहेर) बांधावा लागला.
खालतं (पूर्व)/वरतं(पश्चिम)/गंगकडं(दक्षिण)/डोंगराकून (उत्तर) दिशांचे शब्दार्थही आपणांस गवसतात. यावरून खेड्यातील माणसं किती हुशार असतात, हे कळते.’जुनं ते सोनं’ हे ओळखता आलं पाहिजे.
सावकार नानाचौधरीचे उलटे डाव, त्याच्यावर उलटलेले डाव, उलटे वागणे, लोकांनी त्याला लावलेले उलटे दूषणं हे ‘वसुली’ कथेत आहेत. लुबाडण्याची पत आणि कष्टकर्याची पत यातील घालमेल काळीज लफलफ करणारी आहे. ‘सावकारी वंगाळ अन् सावकाराचे जगणेही वंगाळच’.पण त्याची धर्मपत्नी लई गुणाची. सीता खरंच सद्गुणाची खाण. कावळ्याच्या संगतीला ‘कोकिळा’ असावी जीवन नादर होते, हेच लेखकाला सांगावेसे वाटते काय ? दलाल विठ्ठल वाईट आहे. पण त्याला चांगली माणसं सरळ करतात. ‘सासरवास’ कथेतील सासू भागाबाईचा सुनांना टोकाचा त्रास देण्याचा मुलुखावेगळा स्वभाव. पहिल्या इंदूला नांदू देईना. दुसर्‍या शालूने तिच्या सासरवासामुळे जीव दिला. भागूबाई तिसऱ्या सुनाला-मीनाला फाशी देऊ लागली; ती वाचली; नंतर तिला घटस्फोट द्यावा लागलाय. परत तिचा लेक सदा पहिल्याच इंदू बरोबर नांदू लागला. एका लेकाच्या तीन बायका भागाबाईमुळे दुखावल्या. ‘भागाबाईची गावात नमना गेली’, लेखक लिहितो, तेच खरे आहे. म्हणीचा/बोलीचा वापर कथेत आहे.
त्यामुळे शब्दांचा गहिरेपणा उठून दिसतो.
‘वाटत होती शेवरी तिच मही नवरी’.
‘बिनापाण्यानं हाजामत करील’.
‘जन्माला येतंय अन् कलमा करतंय’.
‘माय-बाबांचा जीव लय तुळतुळ करू लागला’.
‘कव्हर गरिबीत झडती द्याची’.
‘ती जणू आंधाराच्या खोल विवरात जाऊन आंधाराचा अंत बघायची पण अंत लागयचा नाही.’
‘बायजामायला सगळेच कसे बयमान झाले? कारण दुनियाच बयमानाची झालीया, हे कलयुग हाय’.
‘चुलीला लाकडाचा जाळ घातल्यावर भगुन्यातलं पाणी जसं उकळ्या हाणतंय तसं भागूबाई उकळ्याच हाणायची’.
‘बोलू लागल्यावर खोल
विहिरीच्या तळाशी निर्मळ
झरा पाझरावा तसा बारीक
नितळ आवाज याचा’.
बोलीतले शब्द कथेत आपसूकच बसलेत. थोराड(जुने)/भाव खाणे (मोठेपणा घेणे)/झिलान (झुळूक)/ मवाज(अंदाज)/नड(गरज)/खाना खराबा होऊ दे (त्यांचे वाईट होऊ दे)/नमना(इज्जत)/परदीसं-आरदीसं (परक्याचं-अवखळ) इत्यादी-इत्यादी…
प्रसंगानुरूप ‘शिव्या’ हासडलेल्या आहेत. त्यांची जागा इथे आटवत नाही. त्या पुस्तकातच वाचाव्यात. आपले गुळमट लुच्चे मग त्याच सांगतील. त्यांना अशा करामतीचा लईXXX आहे. छन्नीछेदकान्वेषी हे पापुद्रे बाजूला करून कथेचा गाभा ध्यानात घेत असतात. इथे अशी प्रचीती अपेक्षीत असते.मी हे टाळलं तसं लेखकांनी- ‘छाती लोहाराच्या भात्यावानी खाली-वर व्हायची’.
‘नाग-नागिणी सारखी फाॅss फाॅss करणारी’.
‘तुंबलेल्या म्हशीवानी, मरून पोट फुगलेल्या जनावरासारखी’.
या पुनरूक्ती टाळल्या असत्या तर बरं!एखाद्या कथेत वरील लिहिणे चांगले वाटते पण अनेक कथांत ही वाक्ये गर्दी करतात.
एक मात्र खरं की, एकूणच वस्तुस्थिती, वस्तुनिष्ठपणा जपल्यामुळेच कथा रंगतदार आणि खऱ्याखुऱ्या झाल्यात. मानसिक खळबळा करण्याची ताकद कथेत आहे. झाकल्या माणसांना विचार उजेडाकडे नेण्याचा प्रयत्न सार्थकी लागलेला आहे. चांगुलपणाचा कैवार घेण्याचा वसा दिसतो. मनामनाचे बळ जीवनात धडका देऊन जीवनाची परिक्रमा पूर्ण करणारे आहे. आयुष्याचे मोल आणि तोल तोलून धरण्याची वैचारिक परिमाणं हाती येतात. कथेत घटनांचे काही मऊ-मसार मातीचे क्षण, तर काही अणकुचीदार दगडांचे टणत्कार टोचतात. माणूस अस्वस्थ होतो आणि आत्मविचार करतो. वाचनानंतर कलात्मक का जीवनात्मक कथा? असा वाचक प्रश्नाने निथळतो, त्यावेळी मला या कथा जीवनात्मक वाटतात. कलात्मकतेत रिकाम्या जागा भरणे , उच्चध्येयवाद, भलीमोठी स्वप्नं, उदात्तीकरण, थोर विद्वतेनं वाचकांच्या अपेक्षा उंचावून आभासीपणाचे पेव फोडणारे, बुद्धीचा भुगा करणारे लेखन धारदार होते. अशावेळी काळाचे सोबती का कालातीत लेखन ? या प्रश्नाचे उत्तर आपल्याहाती ‘कालातीत’ म्हणून पक्के असते. आपल्या या आत्मविचारांनी आपला अभ्युदय होतो. लेखकाला याचेही भान असेलच?
साध्या-साध्या माणसांना/कष्टाला उजळ करून ‘सन्मान जपण्याचे सौजन्य’ पदरात महादान देणारी ही कथा आहे. वाचक धन्य-धन्य पावतो.
रा.रं. बोराडेंच्या ‘बोरी-बाभळी’ कथासंग्रहाची या कथासंग्रहाच्या वाचन निमित्ताने याद आली.
कोणी कोणाच्या राशीचे नसतात, पण या सकस कथांची रास मोठ्या मोठ्यांच्या कथांजवळची वाटावी इतकी निश्चित्तच ‘मोठी’ आहे!
‘परवड’ चे स्वागत!
-अरूण चव्हाळ, परभणी
📞: 7775841424/
9156767605
ई-मेल:aniketchaval@gmail.com
‘परवड'(कथासंग्रह)
कथाकार: बबन आव्हाड.
पृष्ठ संख्या : 225
प्रकाशक: साक्षात प्रकाशन, औरंगाबाद.
खरेदी मूल्य:₹280/-

error: Content is protected !!