आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. यंदा कोरोनामुळे सर्वच सण, उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. असे असले तरी गर्दी न करता रीतीरिवाज मात्र पूर्ण केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे गरबा, दांडिया, विविध स्पर्धा आदी भरगच्च कार्यक्रम नसले तरी नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी ऑनलाईन कार्यक्रमांकवर अधिक भर आहे. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्र।शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हार्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा या देवीचे हे नऊ रूप आपण बघितल्यानंतर, तिचे जे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते, त्यात कोणी उपवास एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. देवी माता, तिची निर्मिती असलेल्या आपल्या जीवनातील सर्व रुपे, सर्व कला, संगीत आणि ज्ञान ह्या प्रति आपला परम आदर व्यक्त करण्यासाठी हे नऊ दिवस विशेष पूजा, यज्ञ, होम, उपवास, ध्यान, मौन, गायन, नृत्य आदींनी भरगच्च असतात. समस्त मानवजातीला अज्ञान आणि सगळ्या दुष्ट प्रवृत्तींपासून वाचवणारी तारणहार, रक्षणकर्ता म्हणून देवीला पुजले जाते. जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणार्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.
Netflix bez VPN
Netflix bez VPN