आयुष्यभर सोबत असतात आणि नंतर ही आपली ओळख बनुन लोकांच्या स्मरणात रहातात त्या आठवणी. नाना प्रकारच्या असतात…. चांगल्या, वाईट, आनंदी, दु:खद, लहान, मोठ्या, आपल्या, परक्या, हस-या रडक्या वगैरे वगैरे आठवणी मनात घर करून असतात. त्यांचे स्वत:चे असे स्पेशल विश्व असते. बाह्य जगापासुन अनभिज्ञ असलेल्या ह्या आठवणीं आपल्याशी संवाद करत असतात.
कधी सकाळी गरम चहा पिताना डोकावतात,
कधी देवघरात पुजेच्या वेळी अंत:करण उजळवतात, कधी चिंब पावसात भिजताना भावनांची छत्री देतात, कधी रखरखत्या उन्हात ही संवेदनांची सावली करतात…
कधी हिरमुसलेले मन एकटेच बसुन रहाते. त्या वेळेस हे वाईट जग सोडुन, सर्व बंधने तोडुन मुक्त व्हावेसे वाटते…
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।
संत कबीर
अर्थ : जेव्हा मी जगात ‘वाईट’ शोधायला निघालो तेव्हा मला तिळमात्र वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.
कारण आपल्या जीवनात येणारी माणसे काही ना काही आठवणी देऊन जातात. आणि त्यातल्या कित्येक छान क्षणांची दौलत असतात.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण ऐवढे व्यस्त असतो की घड्याळाच्या काट्यावर पळत रहातो. पण एखाद्या निवांत क्षणी मन हतबल झाले असताना आठवणींचे सवंगडी गराडा घालतात व मग सुरू होते विविध आठवणींची बरसात. तीच बरसात मग आपल्याला गुरफटवुन उबदार शेला बनते.
प्रत्येक नवी सकाळ ही जणु पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करावी. म्हणजे आजचा दिवस अधिक सुंदर होत जातो.
साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या ‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी केली आहे.
तसेच आठवणींचे आहे. त्यांच्या सहवासाने आपण स्वत:ला नव्याने शोधतो व आत मनात डोकावता स्फुर्तीस्थाने सापडतात. आणि जगण्याचा प्रवास सुखकारक वाटु लागतो.
परवा जुने फोटो अल्बम पहाताना आज्जी बरोबरचा लहानपणीचा फोटो सापडला. आणि मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागले. आज्जी म्हणजे एक प्रसन्न, भावुक, शिस्तप्रीय, सोज्वळ, प्रेमाची साय, ममतेचा सागर आणि वात्सल्याची गोधडी होती.
लहाणपणी जेवणे वगैरे उरकली की आईला थोडी फार मदत करून आज्जीच्या डाव्या उजव्या बाजुला आम्हा भावंडांची बैठक असायची. सर्व प्रथम आज्जी प्रत्येकाचा दिवस कसा गेला, आज नवीन कांय केले, एखादी छान गोष्ट आठवणीत ठेवण्या सारखी घडली कां…. असे ठराविक प्रश्र्न विचारून आम्हाला बोलते करायची. मग प्रत्येकाची उत्तरे ऐकुन त्यावर कधी कधी चर्चा व्हायची. कधी शाबासकी मिळायची तर क्वचित दटावणी द्यायची. आजची चूक पुन्हा नाही करणार याचे आश्र्वासन घ्यायची. मागे कधी तरी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायची. ह्या सर्वांमध्ये आमचा वेळ ही छान जायचा. या सुसंवादाने मनातील किल्मीशे कमी होऊन सकारात्मक ऊर्जा मिळायची.
मग आज्जी आवर्जुन तिच्या लहानपणची एखादी आठवण सांगायची. डोळे पेंगुळलेले असायचे आमचे. तिच्या मांडीवर कोणी डोके ठेवुन झोपायचे याचे वार ठरलेले असायचे. ती सारे ऐवढे छान रंगवुन सांगायची की डोळे मिटु लागले की मधुनच डोळे मोठे करून झोपेला आम्ही थोपवायचो. क्वचित लवकर आवरलेले असले की ती पौराणिक, रामायण, महाभारत मधील कथा सांगायची. व पुर्वी सांगितलेल्या कथेचा संदर्भ देऊन प्रश्न विचारायची. जो बरोबर उत्तर देईल त्याच्या पाठीवरून प्रेमाने हाथ फिरवुन गाला वरती मुका द्यायची. फार मोठे बक्षिस मिळाल्या सम दोन दिवस ते कौतुक आम्ही मिरवायचो. घरी दारी मग सा-यां कडुन ही कौतुकाची थाप मिळायची. आई कडुन बक्षिस म्हणुन एक लाडु जादा मिळायचा. आम्ही सारी भावंडे तो लाडु वाटुन खाताना जास्तच गोड वाटायचा.
आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन जीवन संपन्न केले आहे व एक छान ओळख बहाल केली आहे. मग रोजच्या जमाखर्चांची मांडणी व हिशोब करणं क्लेशदायक होते. हा ऊहापोह करणे सोडून द्यावे. कारण आयुष्य हा आठवण बनणारा प्रवास आहे.
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी सोबत येतात…
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.
एक ऊबदार शेला बनुन….!
ज्योती कुलकर्णी, मुंबई