…आता आणखीनच सोपे झाले…

काही लाखांच्या नोकरीनंतर आता काही हजारांत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुठेही बदली ? - भाग 2

पुणे – मागील भागात म्हटल्याप्रमाणे एखाद्या सुपरहिट हिंदी चित्रपटाला शोभेल अशी घटना परभणी येथील कृषी विद्यापीठात घडली. एका मुन्नाभाई फेम व्यक्तीने नोकरीच्या नावाखाली एका बेरोजगाराला वीस लाख रुपये घेऊन चक्क नोकरीची ऑर्डर दिली. याबाबत बरीचशी माहिती आम्ही पहिल्या भागात दिली. त्यानंतर आम्हाला असंख्य वाचकांचे व हितचिंतकांचे फोन व संदेश सुरू झाले की पुढील भाग लवकर प्रकाशित करा, नेमके प्रकरण काय आहे ते समजू द्या… परंतु प्रकरण इतके गंभीर व गुंतागुंतीचे आहे की, आम्हाला समजण्यासच बराच अवधी लागला. परंतु यात विद्यार्थ्याचे नुकसान होवू नये व चुकीची माहिती वाचकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी शब्दराजची टीम अहोरात्र मेहनत घेत होती. अखेर सत्य समोर आले व ते वाचून आपणासही धक्का बसेल.

विद्यापीठातील ’ज्या’ कर्मचार्‍याने बोगस ऑर्डर देवून फसवणूक केली. त्याच कर्मचार्‍याने बदलीसाठीही काही रक्कम घेवून बोगस ट्रान्सफर ऑर्डर दिल्याचे बोलले जात आहे. ज्या विद्यार्थ्याची फसवणूक झाली तो अतिशय साधारण घरचा विद्यार्थी असून पहिले नोकरीसाठी पैसे व नंतर बदलीसाठी पैसे असा हा गैर प्रकार आहे. बदलीसाठी पैसे घेतल्या गेले का याची माहिती काढताना दबक्या आवाजात असे कळाले की, काही हजारांत विद्यापीठात बदल्या करून दिल्या जातात ? सदर नोकरी घोटाळा प्रकरणाने विद्यापीठातील बदल्यांचाही विषय परत चर्चेत आला असून येथे काही हजारांत वाटेल तिथे बदली करून दिली जाते असे बोलले जात आहे. तसेच आपल्या मर्जीतील कर्मचारी सांभाळण्यासाठी किंवा एखाद्याला जाणुनबुजून त्रास देण्यासाठी बदली केल्याचेही प्रकार अनेकदा चर्चेचा विषय असतो. काही महिन्यांपूर्वीच विद्यापीठातील बदल्यांवरून चांगलेच रान उठले होते. अशा प्रकारांना कागदोपत्री कुठलाही पुरावा नसला तरी हे सत्य नाकारून चालणार नाही. कारण पहिल्या भागानंतर विद्यापीठातील अनेक कर्मचार्‍यांनी आमच्याशी संवाद साधत येथे घडत असलेल्या अनेक चुकीच्या कामांबाबत माहिती दिली. परंतु ते त्यांच्या नोकरीचा प्रश्‍न असल्याने उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. तसेच येथे झालेल्या आर्थिक व्यवहारांचा कुठलाही पुरावा राहत नाही. मात्र बर्‍याच प्रकरणांत बोगस कागद तेवढा राहतो. नंतर प्रकरण उघडकीस आले, कोणी एखाद्या माध्यमाने उचलून धरले तर त्यावर साधारण कारवाई करून विद्यापीठ प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानते.

सदरील काही लाखांत नोकरी व काही हजारांत बदलीचे प्रकरण गंभीर आहे. तसेच या प्रकरणातील व्यक्तीने विद्यापीठातील काही विभागांत जवळपास एक वर्ष काम करूनही ही बाब कोणाच्या लक्षात येत नाही याचा अर्थ काय? लाखो रूपये घेवून बोगस ऑर्डर देवून चक्क संबंधिताला नोकरीवर रूजू करून घेण्याचा थक्क करणारा प्रकार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन मात्र खडबडून जागे होण्याऐवजी ’आगा.. काही घडलेचि नाही…’ या थाटात आहे. यावरून स्पष्ट होते की प्रशासनाकडून हे प्रकरण पूर्णतः दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आता विद्यापीठात सुरू असलेल्या या गैरकारभाराची सर्वत्र चर्चा होत असून विद्यापीठ प्रशासन विद्यापीठाच्या नावाला काळिमा फासणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कार्यवाही करण्याऐवजी त्याला पाठीशी घालत आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. घडलेल्या या प्रकरणानंतर आता विद्यापीठातील कर्मचार्‍यांना आपल्या ऑर्डरवर शंका निर्माण होत आहे. एक दुसर्‍यावर माझी ऑर्डर खरी की तुझी ऑर्डर खरी याबाबत विचार करण्यास मजबूर झाले आहेत. विद्यापीठात अजूनही असे प्रकार घडलेले असू शकतात असाही एक सूर आहे. परंतु त्याबाबत आमच्यापर्यंत अधिकृत माहिती आलेली नाही. स्व. वसंतराव नाईक यांच्या नावाने असणार्‍या या विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा जाणार्‍या या घटनेची राज्यपालांनी चौकशी करावी आणि भ्रष्टाचारात सहभागी असणार्‍या मोठ्या माशांवर कायद्याचा जरब निर्माण करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

एवढे सर्व घडल्यावर विद्यापीठाकडून ’त्या’ व्यक्तीवर अजूनही कठोर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही, यामुळे या प्रकरणात संशय अधिकच बळावतो. आमचे एकच म्हणणे आहे या प्रकरणात दोषी असणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी व विद्यापीठाने या प्रकरणाबाबत आपली अधिकृत भुमिका व सत्य बाहेर आणले पाहिजे.

पण सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे काही लाखांत नोकरी आणि काही हजारांत बदली… व्वा… याबद्दलची अजून बरीच माहिती म्हणजे बोगस ऑर्डर ते बोगस ट्रान्सफर याचा प्रवास पुढील भागात…

टिप ः कोणी जर पैसे घेवून नोकरी देतो म्हणत असेल तर कधीही तशी चुक करू नका. त्याचे फार वाईट परिणाम भोगावे लागतात ते कसे..? हे आपण वाचतच आहात.
तसेच विद्यापीठातील काही चुकीच्या कामांबाबत काही लोकांकडून थोडी – थोडी माहिती मिळत आहे. ते संपूर्ण माहिती देण्यास घाबरत आहेत. आम्ही त्यांना विश्‍वास देतो की, आपले नाव कधीही उघड केले जाणार नाही. परंतु आपण दिलेल्या माहितीवरून शब्दराजच्या माध्यमातून न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

job scam in vnmkvnokri ghotalaवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
Comments (0)
Add Comment