आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

शब्दराज ऑनलाईन,दि 25 ः
राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत.

आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

नवरात्रीपासून राज्यातील मंदिरे सुरु होणार

तत्पूर्वी शुक्रवारी राज्य सरकारनं शाळा आणि मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

 

Comments (0)
Add Comment