दिनेश कुऱ्हाडे
आळंदी,दि 10 ःमहाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आळंदी शहरातच आयसोलेशन सेंटर उभारले जावे यासाठी काही ठराविक आजी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न सुरू केले वेळवेळी प्रशासनासोबत बैठकी घेण्यात आली यात कसलाही मार्ग निघाला नाही. एक महिना होऊन सुध्दा आळंदीकर आयसोलेशन सेंटरच्या प्रतिक्षेतच आहे.
कोरोणा टेस्ट केल्यानंतर संबंधित रुग्णांना चाकण जवळील म्हाळूंगे येथे नेले जात आहे. आळंदी पासुन २० किलोमीटर दूर असल्याने काही नागरीक स्वतःच्या घरात आयसोलेशनमध्ये राहत होते. पण दोन तीन दिवस घरी राहून परत ते नागरीक शहरात फिरताना दिसत होते. तर काहींचा भाड्याच्या खोल्या असल्याने कोरोणा बाधित रुग्णांना सोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा राहात असत त्यामुळे कोरोणा चा प्रादुर्भाव वाढणे कमी होण्यापेक्षा तो वाढण्याची शक्यता जास्त असल्याने तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये आयसोलेशन सेंटर सुरु करण्याची मागणी पुढे आली.
यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय, आळंदी नगरपरिषद, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी पोलिस स्टेशन यांच्या संयुक्तपणे एकमेकांच्या सहकार्याने आयसोलेशन सेंटर सुरू केले जाणार असे ठरवले गेले होते परंतु या सर्वांच्यात योग्य तो समतोल साधला गेला नाही.
याबाबत आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गणपत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रांताधिकारी यांच्या कडे आयसोलेशन सेंटरच्या बाबतीत प्रस्ताव सादर केला असून अजूनही त्यावर उत्तर आले नाही. प्रशासनाकडून काम करुन घेणारा लोकनेत्याची आळंदीकरांना उणीव भासत आहे. आळंदी शहरातील सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आळंदीकरांच्या आरोग्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.