ऊसाला लागेल कोल्हा नाही, ऊसात घुसले रानडुक्करे

माजलगांव, धनंजय माने – माजलगांव तालुका हा ऊसाचा तालुका म्हणून मराठवाड्यात ओळखल्या जातो कारण तालुक्यातील सुपीक जमीन आणि त्या च्या सिंचनासाठी उपलब्ध असलेले सिंचनाचे स्त्रोत.यांच्या जोरावर बळीराजा नगदी व भरवशाचे पीक म्हणून ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतो तशीच ती यावर्षी १५हजार हेक्टर क्षेत्रात केली आहे. अर्थ व मेहनत खर्च करून ऊस चांगला पोसला आहे. पण ‘तुझ्या ऊसाला लागेल कोल्हा ‘ हे जुने गाणे विसरून तुझ्या ऊसात घुसले रानडुक्करे.अन् गाळपा अधिच झाल्या चिवट्या.असे म्हणण्याची वेळ आली असुन वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.ग्रीन बेल्ट असा उल्लेख होत असलेल्या माजलगांव, गंगामसला, किट्टीआडगाव, नित्रुड या कृषी मंडळात ऊसाची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे आणि त्या नुसार उत्पादन जास्त होईल अशी खात्री आहे. कारण याभागातील ऊसाची वाढ व पोस उत्तम आहे. या वाढी व पोसाला रानडुक्करांनी उच्छाद मांडल्याने ऊस उद्ध्वस्त होत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.हे टाळण्यासाठी बळीराजा ला बळ मिळाले पाहिजे म्हणून वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाय योजना सुरू करणे नितांत आवश्यक आहे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी पोटतिडकीने करताहेत. पण वनविभागाचे विभागीय कार्यालय धारुरला असल्याने संबंधीत अधिकारी, कर्मचारी माजलगाव तालुक्यात येतील का नाही हे काम त्यांच्या फायदेशीर ठरत नाही म्हणून ‘दुरुनच डोंगर साजरे , करतील अशी साशंकता बळीराजा कडून व्यक्त केली जात आहे.

आमच्याकडे १०००१ या जातीचा ऊस एकूण पाच एकर आहे . सध्या ऊस चांगला आलेला आहे . परंतु रानडुकराच्या त्रासाने आम्ही वैतागून गेलो आहोत . दररोज दोन ते तीन बैलगाड्या भरतील इतका ऊस रानडुक्करे खराब करत आहेत . यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान होत आहे तसेच शारीरिक देखील त्रास होत आहे . तरी वनविभागाने लवकरात लवकर रानडुकरांचा बंदोबस्त करावा.
– शिवाजी बादाडे, शेतकरी राजेगांव

Comments (0)
Add Comment