एक प्रसंग मदतीचा!

सध्या कोरोना महामारीने… जगात धुमाकुळ घातला आहे.अवघ्या माणव जातीची झोप उडवली आहे.आपला देश ही, कोरोनाशी लढतो आहे.त्यासाठी…
कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी आज संचारबंदी,व देश लाॅकडाऊन करावा लागला आहे.कोरोनाच्या विषाणुला घाबरून माणसं घरातच कैद झालीत.जी विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत ती पोलीसांचा मार खात आहेत.कोंबड्यांना झापात झापले जात होते आता माणसंच घरात झापली जात आहेत.माञ पाखरं मुक्त झाली आहेत.प्राणी जंगलात आज मुक्तपणे संचार करत आहेत.शहरात कावळ्यांचे मुक्तपणे…”काव! काव!”चालूच आहे. खेड्यातल्या गावकुसात… चिमण्यांचा चिवचिवाट आजही मुक्तपणे चालूच आहे.झाडांनी मोकळा श्वास घेतला आहे.नद्यांचा कधी नव्हे …आता तळ स्वच्छ झाला आहे.उंन्हाळ्यातही थंड, शुध्द हवा! शहरातल्या मोकळ्या रस्त्यांनी वाहाते आहे.गाव शहरातले रस्ते,राजमार्ग आज मोकळे झाले आहेत.माणसांनी माञ कोरोनाला टाळण्यासाठी घरातच कैद करवून घेतली आहे.२५मार्च रोजी, लाॅकडाऊनला सूरवात झालती.आज एप्रिलची२५तारिख निघाली.एक महिना झाला …”गाव,शहर बंद!काम बंद!”या महामारीने अनेक गोष्टी माणसाला नव्याने शिकवल्या…”माझं तुझं करत व स्व:ची प्रगती करण्यासाठी …हव्यासापोटी माणसं, पैसा कमवण्यासाठी राञंदिवस धावत होती…यासाठी नाती विसरली…माणुसकी विसरली …स्वत:चे कुटुंब व आपला व्यावसाय,नोकरी येवढं मर्यादीत स्वत:चं आभाळ…केलं होतं.माणसांने विज्ञानातून खुपच प्रगती केली आहे.विकास साधलाही आहे परंतु निसर्गाची नासाडी करत…पर्यावरणाचा —हास करत निसर्गाने नटलेली… जंगले तोडून सिमेंट काॅंक्रेटची जंगलं उभारली आहेत.यामुळे जगात व आपल्या देशातील शहरांना सुज आली होती.महाआजगरासारखी वाढणारी शहरं त्यांचा आहारही महाआजगरासारखा तसाच!मुंबई शहर …तर समुद्रातील बेटच! पण “मुंबई मेरी जाण!” म्हणत अनेक श्रीमंत ,गोर,गरिबांना या शहराचं आकर्षण होतं आणि आहे.समुद्रात भराव टाकून शहर पसरवलं आणिं समुद्रालाही माणसानं लहान केलं!पुणे शहरही आसच सुजलं !या शहरात मजूरांचे लोंढे वाढले…झोपडपट्यांची बजबजपूरी जाणीवपूर्वक वाढू दिली .आज कोरोनाने मुंबई,पुणे शहराची दैना केली आहे.आपला प्रगतीपथावर आसणारा देश थांबला आणि जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.यात शहरातील व गावखेड्यातील मजूरांचे व शहरात लाॅकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजूरांचे, विद्यार्थ्यांचे आज प्रचंड हाल होतांना दिसत आहेत.केंद्र व राज्य सरकार नागरिकांना धीर देत कोरोनाचा सामना करत आहे.जिल्हा,तालुका,गाव,खेडे येथील शासकीय यंञणा राबत आहेत.मजूरांचे काम बंद झाल्याने अनेक सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते…आपआपल्या परिसरात अन्नधान्य वाटप करून गरिबांना मदतीचा हात देत… माणुसकीचे दर्शन घडवत आहेत.आज कंपन्या,उद्योग,महसूल विभाग बंद !असल्याने शासनाची तिजोरी खडखडित रिकामी झाली आहे. आहे.बागायतदार शेतक—यांच्या मालाची नासाडी झाली आहे.देशाची अर्थव्यवस्था आज मागे गेली आहे. हे जरी खरे असले तरी “माणुस जगला पाहिजे !”हे महत्वाचे आहे.ही, महामारी अटोक्यात आल्यानंतर अर्थव्यवस्था सुधारता येईल.”अरे!आयुष्याच्या पुंन्हा पेटवा मशाली!” म्हणत अर्थव्यवस्थेला बळकटी देता येईल.आज सगळीकडे शहरात,खेड्यात नागरिक चिंता करताहेत…नोक—या जातील! पुढे कसे होईल! परंतु आलेल्या संकटाचा सामना करावाच लागेल.या परिस्थितीत न खचता,चिंता न करता तंदुरूस्त राहिल्यास केंव्हाही घाम गाळून, श्रमाच्या बळावर व आपल्या बाहुच्या ताकतीवर लढता येते. हा आधार एकमेकांना द्यायची गरज आहे.आज पोलीस जनतेची काळजी घेताहेत.डाॅक्टर्स ,नर्स जीव धोक्यात घालून… लढताहेत.आपण घरातच सुरक्षित राहायचे आहे आणि गर्दी टाळायची आहे.
आज शहरात अनेक विद्यार्थी,विद्यार्थिनी अधिकारी व्हायचं आहे.एम.पी.एस.सी.ची परीक्षा देवून मोठं व्हायचं म्हणून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शहरात आले होते.ज्यांची परिस्थिती बरी होती ते आपआपल्या गावी पोहचले ज्यांची परिस्थिती गरिबीची होती ते लाॅकडाऊनमुळे शहरात अडकले!आज यांच्या एक वेळेसच्या जेवनाची बोंब झाली!उपाशी पोटाने अभ्यास कसा होईल?विद्यार्थी कांही तरी करून मार्ग काढतील पण विद्यार्थिनी आपल्या पोटाची सोय कशी करणार?आज कोरोनाच्या धास्तीने डोक्यावरचं आभाळच निराशामय झालय…जागोजागच्या पडक्या बुरूजावर कबुतरे दु:खाचं गीत गात …आसवे ढाळताहेत!एक उध्दास वारे देशावर व आपल्या परिसरात घोंघावते आहे.कोरोनाचा अंधार रोजच गडद होत चाललाय!माणसं निराश होतायेत…पुढे किराणा मिळतो की, नाही. या कारणामुळे अनेक जन तीन,चार महिन्याचा किराणा भरताहेत.दुकानदार लुटताहेत …भाजी चढ्या भावाने विकली जातेय…गर्दी टाळावी म्हणून नगर परिषेदेच्या गाड्यावरील भोंगे रांञंदिवस… फिरताहेत.पोलीसांच्या गाड्या फिरताहेत.पोलीस माणसांना रस्त्यावर फिरू देत नाही म्हणून शहरातली माणसं, अजुबाजुच्या मोकळ्या शेतातल्या नांगरठीत जाऊन बसत आहेत. आता शेतात गर्दी वाढत चालली आहे.पोलीसांनी काय आता नांगरठीत फारावे काय?हे सगळं विदारक चिञ आज भवतालचं दिसतं आहे.
तुळजापुरातली एक गरिब कुटुंबातील, विद्यार्थीनी जी,की जीचे आई,वडील मजूरीवर जगताहेत व त्यावरच आपल्या मुलीचे पी.जी.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.आपली मुलगी हुशार आहे.अभ्यासकरून मोठ्या पदावर जाईल म्हणून त्यांनी एम.पी.एस.सी.करण्यासाठी, उस्मानाबाद शहरात ठेवले होते.ती मुलगी ही हुशार. रूम भाड्याने घेऊन अभ्यास करत होती…परीक्षेची तयारी करत होती.कोरोनाच्या परिस्थितीत ती, लाॅकडाऊनमध्ये अडकली!आई,वडील गावाकडे आणि ती येथेच.तिने एक महिना कसाबसा काढला आणि तिची संचारबंदीत… झाली पोटबंदी! ती मुलगी लाजाळू असल्याने घरमालकालाही सांगितले नाही.”आपण उपाशी आहोत!”हे सांगण्याचं धाडस तिच्यात येईना.
केवळ पाण्यावर तर किती दिस ढकलणार!
दि.२३/४/२०रोजी,घरातल्या गॅलरीत ….डोंगराआड निघालेल्या भाकरीयेवढ्या …लालसर सूयर्याकडे पहात बसलो होतो…कासव आकडावे तसा सूर्य आकडत चाललेला दिसत होता .सायंकाळची दिवे लागणची वेळ होत होती.अंधाराची छाया गडद होतांना दिसत होती.बाहेर पडायची इच्छा होती…तेवढ्यात पञकार भाऊसाहेब अणदूरकर या मिञाचा फोन आला… साडेसाहा,पावनेसातची वेळ आसावी… “सर !आमच्या उंबरे कोटा येथील, आमच्या घराजवळच ,एम.पी.एस.ची परिक्षेची तयारी करण्यासाठी, तुळजापूरातील एका गरिब कुटुंबातील , गरिब मुलगी ,एक वर्ष झाले .अभ्यासासाठी आली आहे .ती भाड्याने राहाते…सध्या ती.लाॅकडाऊनमध्ये अडकली आहे,महिना तीने जवळच्या किराणा सामानात कसा तरी काढला आहे.आम्ही दोन,तीन दिवस तिचे,भागवले आहे.तिला मदत करणे आवश्यक वाटते ..,आपण कांही तरी करा सर…इंदीरा नगरला आपण व मिञपरिवाराने मदत केलीच आहे…!” भाऊसाहेब त्या मुलीची दाहकता सांगत होता…अंगावर शहारे उमटत होते.या अगोदर आम्ही सचिन लोखंडे बरोबर इंदीरा नगर येथील गरिब मजूरांना धान्य व आंबेडकर जयंतीला जेवण वाटप केले होते.त्यावेळी गरिबांची त्या जेवणावर उडालेली झुंबड पाहिली होती.आज एका नव्या तरूणीची व्यथा ऐकूण काळीज चिरावं तसच झालं!
आता कोरोनाऐवजी भूकबळींचीच चिंता वाटायला लागली!काय करावे सुचेनासे झाले.त्या तरूणीने आपली व्यथा भाऊसाहेबांच्या एम.पी.एस.सी.पास झालेल्या बहिणीला सांगितली म्हणून कळाली! भाऊसाहेबाला म्हणालो…
“हो!एका तासात येतो. त्या मुलीची जबाबदारी घेऊयात. तुमच्या ओळखीची ती मुलगी आहे तर तिला घरीच बोलवा. शेजारीच आहे तर … त्याला आश्वस्त केले!”
मिञाचे ऐकून मन खिन्न व सुन्न झाले.वाढता व जीवघेणा कोरोनाचा धोका…समाजमन व समाजभान असल्याने…अनेक जण उपाशी राहाताहेत.हे सचिन कडून रोजच फोनवर कळते. त्यामुळे पोटभर जेवण ही जाईनाशे झाले.
आमच्या मिञपरिवारातील, शहरातील सचिन लोखंडेला फोन केला…सचिन तीन कि.गहू,दोन कि.तांदुळ,एक किलो शेंगदाने,डाळ,तिघट ,साबण,साखर एक किट घेऊन या तेथे आल्यावर जे काय पैसे होतील ते मी देतो. आपल्याला साडे सात वाजता उंबरे कोट्याकडे जायचे आहे.”
सचिनने सांगितल्याप्रमाणे एक किट घेऊन मागे एका मिञाला बाईक वर बसवून पोलीसांना चुकवत उंबरे कोट्याजवळ सायंकाळी साडेसात वाजता पोहचला .मी ही पोहोचलो.
आमचा मिञ भाऊसाहेब अणदूरकर यांच्या बहिनीची ती मुलगी ओळखीची होती.
त्या मुलीच्या चेह—यावर काळजी दाटलेली दिसत होती.त्या मुलीला नाव विचारले .शिक्षण कोठे झाले म्हणल्यावर ती म्हणाली…”आर.पी.काॅलेज मध्येच अर्थशास्ञात पी.जी.झाले सध्या मी एम.पी.एस.ची तयारी करते आहे.”भाऊसाहेब त्या मुलीला म्हणाले..,”जगताप सर आर.पी.काॅलेजमध्येच मराठीचे शिक्षक आहेत तेंव्हा त्या मुलीला आनंद वाटला…आपल्याच काॅलेजचे सर…”
आठ,दहा दिवसाचे किराणा सामान पुरेल येवढे तिच्या हातात ठेवले…आणि म्हणालो…”ताई आजचा प्रसंग कधी विसरू नकोस?चांगला अभ्यास कर नक्किच तू अधिकारी होशील..तू या शहरात एकटी नाहिस. तुला गरज वाटली की,कळव लाजु नको .तुझे आई,बाबा तुळजापूरात आहेत. तू आमच्या कुटुंबातील ताईच आहेस! तेंव्हा तिच्या चेह—यावर हसू उमटले!
त्या मुलीला आश्वस्त करण्यासाठी म्हणालो…
आपल्या, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी बहुजनांना शिक्षणाची सोय केल्यामुळेच मी आज रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षक झालो… हा प्रसाद डाॅ.बापूजींचाच व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा समज!
भाऊसाहेब ,बाळासाहेब अणदूरकर हे दोघे भाऊ व त्यांची आई व बहिण तेथे होत्या.त्या पोरीची आवस्था पाहून भाऊसाहेबांच्या मातोश्री म्हणाल्या…”करोना का कसला फिरोना. समदं लोकांचं वाटोळं केलय!लेकरू शिकायला आलं आणि अडकलं!”
त्या मुलीला पुंन्हा म्हणालो…
“बाळ हे आताचं भागव!आणि काळजी करू नकोस…जोपर्यंत हा लाॅकडाऊन आहे तोपर्यंत तुझी जबाबदारी आम्ही घेतोय!
त्यावर त्या तरूणीला खुपच बरे वाटले आणि तिच्या चेह—यावर आनंद ओसंडून वाहातांना दिसला. भाऊसाहेबांच्या घराच्या आसपास कांही धुणीभांडी करून गुजरान करणा—या,वयस्कं स्ञीया की आज त्यांचे काम बंद झाल्याने …त्यांच्या चुली विजल्या आहेत.भाऊसाहेब चार पाच जणींना शिवभोजन दररोज घेऊन जातो आहे त्यांना मदत करतो आहे.त्या मुलीला मदत भाऊसाहेबांच्या दारासमोर दिल्याने त्यांच्या आसपास गरिब असणा—या निराधार,विधवा ,वयस्क स्ञीयांना कळल्याने ज्यांची उपासमार होत आहे आशा महिला आता भाऊसाहेबांच्या आईकडे मदतीची यातना करत आहेत.
त्या महिला त्यांच्या आईला म्हणत आहेत…”तुमच्या पोरांना सांगा आम्हाला ही कांही तरी द्या म्हणाव!”
भाऊसाहेब पुंन्हा रोज फोन करतोय…”सर आपण तिघा चोघांनी एकञ येवून एक पोतंभर गहू व पोतंभर तांदुळ घेवून या महिलांना वाटुन मोकळे होऊ!”
काय असेल ते बघा व मी किती पैसे द्यायचे ते सांगा आणि त्या गरजु महिलांना धान्य देऊयात.असे सांगितले आणि भाऊसाहेब तयारीला लागला.
आज गोर,गरिबांच्या डोक्यावरलं आभाळच फाटलय…सरकारी यंञणा त्याही मदत करताहेत.पण आता हे फाटलेलं आभाळ कुठं कुठं शिवायचं ?हा प्रश्न महत्वाचा आहेच.
एक विषय मिटवला की दुसरा विषय समोर येतो आहे.आज दि.२५एप्रिल रोजी ,सामाजिक कार्यकर्ता ,सचिन लोखंडे आज शहरातल्या एम.आय.डी.सी.परिसरात रस्त्यांनी पाय मोकळे करायला चालत निघाला होता.तेवढ्यात त्याला दोन तरूण येडशीच्या दिशेने चालत चाललेले दिसले…सचिनने त्यांना सहज विचारले…
“भाय कहा निकले हो!थकेवाले लगते हो।”
त्यावर ते दोन तरूण त्याला म्हणाले…”
हम लाॅकडाऊन मे फसे हुये है। बेंगलोरसे चलते आहे अब दिल्ली के है!दिल्ली को,पयदल जा रहे है!”
बेंगलोर ते उस्मानाबाद सहाशे किमीचा प्रवास…ते दोन तरूण ग्लोकुजची पावडर जीभेवर ठेवत…सुजक्या पायाने…दिल्ली जवळ करताहेत!”
सचिनने हे ऐकल्यावर त्याला भवळच आली..सचिनने सध्या अनेक गरजुवंताना मदत केली आहे.त्यामुळे त्या दोघांना घरी येण्याची विनंती केली आजचा दिवस आराम करा मग उद्या जा म्हणाला फरंतु ती दोन तरूण येडशीच्या दिशेने गेले!”
हा प्रसंग सचिनने फोनवर सांगितला तेंव्हा खुपच जीवघेणी लढाई माणसं लढताहेत हे कळालं!आज कोरोना माणसांची लवकर सुटका करेल असे वाटत नाही.आज शहराभवतालच्या झोपडपट्टीत …पालात अनेक गरिब लोक हाल सोसताहेत.आजच्या काळात गरिबासाठी भाकर महत्वाची झाली आहे.सचिन त्याचे मिञ,भाऊसाहेब व मी आमची ऐपत होती त्या पध्दतीने कांही गरिबांचे अश्रू पुसले आहेत आता गरजुंची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे.त्यामुळे कांही ठिकाणाहून रोजच फोन येत आहेत.पण आता आम्ही ही हात टेकलेत तरीही कांही मिञांना,कर्मचारी,शिक्षकांना फोन करून कांहीची सोय करतो आहोत.पण त्या मुलीला जी मदत केली तो मदतीचा एक प्रसंग कायमचा लक्षात राहिला.ती गरिब तरूणी एक अधिकारी व्हावी येवढीच अपेक्षा!

लेखक
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
मो.नं.९८८११८८२६३

Comments (0)
Add Comment