देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥26॥
अर्थ : हे नश्वर शरीर ज्याच्या सुखा करीता तू दिवसरात्र धडपडत असतोस व कष्ट करतोस पण मृत्यु येताच हे शरीर नाश पावते. म्हणुन या देहाचा दास न होता तू रामदास हो. या भवसुखात जास्त गुंतू नकोस.
समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. त्यांतील एक जण म्हणाला की, ‘हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.’ तर दुसरा मुलगा म्हणाला की,’मूर्ती शेणाची आहे’. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसर्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणार्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या
सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून
दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले – ‘ तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे
ीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे’. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.
समर्थ या श्लोकातुन म्हणतात कि…
आपण या खोट्या मायारूपी संसारात अडकलो आहोत, याच संसाराची अपेक्षा धरून जगत आहोत, आपल्याला या संसाराचीच ओढ लागलेली आहे, पैसा गाडी बंगला बायका मुले या साठीच सगळे कष्ट चाललेत त्यासाठी या पंचभूतांच्या देहाचा कसाही वापर करतो आपण, पैसा पुरेसा असला तरी अजून कमवावासा वाटतो. आणि या भवसागरात खोलवर जाऊन बुडू लागतो.
भवसागर म्हणजे भावविवशतेचा अथांग सागर आहे! भ्रम, मोह, विकारशरण होऊन अशाश्वतातलं आपलं जे गुंतणं आहे त्याचा परिघ क्षणोक्षणी विस्तारत आहे. हाच जणू विराट, अथांग असा भवसागर आहे.
नामजपाचा अभ्यास म्हणजे ठरावीक वेळी, ठरावीक संख्येचा जप करणं सुरू आहे, सद्गुरूंची पूजा-अर्चा सुरू आहे, पण देहबुद्धीतून प्रसवणारा भौतिकाचा जप आणि भौतिकाची पूजा काही सुटलेली नाही.. सद्गुरूंचं दिव्यत्व मान्य आहे, पण देहाचं ममत्व सुटलेलं नाही.. अशा साधकाला अधेमधे खडसवावंच लागतं ना? समर्थही अशी खडसावणी या श्लोकात करतात.
जो सुटकेचा मार्ग होता, त्याद्वारे बाहेर न पडता जर मी त्यातच अडकून बसलो तर तोच सापळा ठरला! त्यामुळे या अशाश्वत देहात न गुंतता, या अशाश्वत देहाची भक्ती करण्यात न गुंतता मी जो शाश्वत राघव अर्थात सद्गुरू आहे त्याच्या भक्तीत गुंतण्याचा अभ्यास केला पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत.
समर्थानीच म्हटलं आहे ना… “अंतरनिष्ठ तितुके तरले। अंतरभ्रष्ट तितुके बुडाले। बाह्याकारें भरंगळले। लोकाचारें॥” (दासबोध, दशक 18, समास पहिला). अंतर्मनात रामचिंतनाचा जो आधार आहे तो कायम दृढ राहिला तर असा अंतरनिष्ठ साधक भवसागर तरून जातो. ज्याची ही धारणा सुटते, असा अंतरभ्रष्ट साधक भवसागरातच गटांगळ्या खात बुडून जातो. “अवधभूषण रामायणा’त या देहाला ‘साधनधाम’ म्हटलं आहे! हा देह म्हणजे जणू साधनेसाठीचं घर आहे! या देहात जडवलेली इंद्रियं ही जणू परमात्मप्राप्तीसाठीची साधनं आहेत! ज्या इंद्रियांच्या आधारे जे सारतत्त्व आहे, जे शाश्वत तत्त्व आहे त्याचं ग्रहण न करता मी जे असार आहे तेच मिळवण्यात, त्याचाच हव्यास धरण्यात आणि त्याच्याच जपणुकीसाठी धडपडण्यात गुंतलो तर या अत्यंत मौल्यवान अशा देह नावाच्या यंत्राचा काय उपयोग?
काम करताना मुखी नाम असावे म्हणजे कर्म सुकर्म होते, असे म्हटले गेले आहे. नाम आणि रूप यांच्या संबंधातील अन्योन्यता संतांच्या अभंगांमध्ये वाचावयास मिळते.
नामस्मरणात मनाला विषयापासून दूर ओढले जाते. मनाची बाहेरची ओढ आत वळते. नाम एका बाजूला षड्रिपूंचे हरण करते, तर दुस-या बाजूला नामस्मरण करणार्या व्यक्तीला शुद्धता देते.
मृत्यूनंतर सर्व काही इथेच राहतं व सोबत फक्त आपल्या कर्माची पुण्याई आणि पाप घेऊन जायचं असतं म्हणून समर्थ रामदासस्वामी म्हणतात कि त्या परमेश्वराची भक्ती कर, त्याचा स्वार्थ आणि आसक्ती ठेव, त्याच्या चरणाशी एकनिष्ठ राहा तरच जन्म -मृत्यूच्या फेर्यातून आपोआप सुटशील.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई