काही मनातले – कोजागिरी पोर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अनेक ठिकाणी एकत्र बसून वर्षांनुवर्षे चांदण्याचा आनंद घेतला जातो. आमच्या लहानपणी या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. एखाद्याच्या बंगल्याच्या गच्चीवर सतरंज्या अंथरलेल्या असायच्या व कलागुणांना वाव देणारा व चंद्र या शब्दा भोवती कार्यक्रमाची थीम असायची. गीत गायन, नृत्य, समुह सादरीकरण, विनोदी किस्से, कविता, एकपात्री असे विविधअंगी गुण दर्शनातुन कोजागिरी पोर्णिमा साजरी व्हायची. त्यानंतर गरम भजी, फाफडा व जिलेबी सोबत गोड केशरी दुध असा मेनू ठरलेला असायचा.

रम्य संध्याकाळी सुरू झालेला कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत पूर्ण चंद्राचे दर्शन घेत चांदण्यांनी सजलेल्या आकाशाच्या साथीने, छान गप्पागोष्टी करत संपन्न व्हायचा. थंडीची चाहूल लागलेली असायची आणि रात्र खुलत जाताना थंडी व वारा सोबत डोळे पेंगाळायचे. पण सर्वां सोबत मस्ती व धम्माल यायची.

शरद ऋतूमधील या पौर्णिमेचे धार्मिक, शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष महत्त्व असते.

घरोघरी मसाले दूध, बासुंदी सारख्या गोड दूधाच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. काही ठिकाणी कोजागरीची रात्र जागवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. यास ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.

कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच कोण जागे आहे, कोण आपले कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.

कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.

सन २०२० मध्ये शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी निज अश्विन पौर्णिमा आहे.
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ही पौर्णिमा पावसा नंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात, पावसात आकाश स्वछ नसते. परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात.

ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. या दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात; या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.

देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.

अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.
कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.

शास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्य प्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याचप्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हाददायी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा.

यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. या उपायाने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. डोळ्यांसाठी लाभदायक जर तुमची डोळ्यांची शक्ती कमी झाली असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडावेळ चंद्राकडे पाहा. या उपायाने तुमच्या डोळ्यांची शक्ती वाढेल असे म्हणतात.

या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावतात. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.

श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. वरुणदेवाच्या कृपेने शेतात पिक डोलत असते. शेतकरी ही आनंदित असतो.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा.
हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.

अशी ही सुख समाधान शांतीचा संदेश देणारी कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
हीच मंगल कामना.

ज्योती कुलकर्णी, मुंबई

kojagiri pornimaकोजागिरी पोर्णिमामराठी लेखमराठी साहित्य
Comments (0)
Add Comment