कोरोना संकटात महिलांच्या ‘कौशल्य विकासाची साथ’

३५ ते ३८ महिलांनी घरी शिवणकाम करुन २५ हजार मास्कचा केला पुरवठा

लातूर, प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग वेढले असताना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या लातूर येथील के बी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकाराने इतर ३ संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शिवणकाम करणा-या प्रशिक्षित महिलांच्या कौशल्याचा वापर करीत अवघ्या १० दिवसात २५ हजार काॅटन कापडाच्या मास्कची निर्मिती केली. ३५ ते ३८ प्रशिक्षित महिलांनी आपापल्या घरी मास्कचे शिवणकाम करुन लातूर येथील जिल्हा आरोग्य कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर पुरविले.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार यांच्यासह अनेक व्यक्ती, संस्था, संघटना आपापल्या परीने मदत, सहकार्य करीत आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी सुद्धा मागे राहिलेली नाही. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रात गरजू व बेरोजगार युवक व युवती तसेच महिलांना देण्यात येते. असेच प्रशिक्षण लातूर येथील के बी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेतून देण्यात येते. गेल्या वर्षी या संस्थेमार्फत गरजू महिलांना मोफत शिवण क्लास, हॅन्ड एम्ब्रॉयडरी सारखे प्रशिक्षण देण्यात आले व प्रशिक्षणानंतर त्यांचे मूल्यमापन करुन त्यांना कौशल्य प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.

भारतात जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या व मार्च महिन्यात अत्यंत गंभीर रूप धारण केलेल्या कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी के बी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग या संस्थेमार्फत कापडी काॅटन मास्कची निर्मिती करुन लातूर येथील जिल्हा आरोग्य कार्यालयाला २०००० तर लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला ३५०० मास्क ना नफा ना तोटा या तत्वावर पुरविण्यात आले. हे मास्क पुरवत असताना शासनाने दिलेल्या सोशल डिस्टनसिंग आदी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. याकामी या प्रशिक्षण केंद्राव्यतिरिक्त झारा फॅशन इन्स्टिट्युट, अर्थक्रांती स्किल डेव्हलपमेंट सेंटर, युनिक गारमेंट अँड फॅशन डिझायनिंग सेंटर मधील प्रशिक्षित महिलांनी यात सहभाग नोंदवून १० दिवसांमध्ये जवळपास २५ हजार मास्कनिर्मिती करण्यामध्ये सहकार्य केले. या चार प्रशिक्षण केंद्रातील अगदी हातावर पोट असणाऱ्या ३५ ते ३८ प्रशिक्षित महिलांनी आपआपल्या घरी शिवणकाम करून हे मास्क संबंधित प्रशिक्षण संस्थेस पुरविले.

Comments (0)
Add Comment