कोरोना संकटाबरोबर पाणीटंचाईचा सामना

घोटभर पाण्यासाठी महिलांना करावी लागते वणवण
माजलगांव, प्रतिनिधी – एका बाजूला कोरोना संक्रमणाचे संकट उभे आहे . तर दुसऱ्या बाजूला सध्या भीषण पाणीटंचाई सुरु झाली असून , अद्याप दोन महिने पाण्यावाचून कसे काढायचे , असा प्रश्न माजलगाव तालुक्यातील रामनगर तांडा येथील लोकांना पडला आहे . गावात कुठेही पाणी मिळत नसल्याने एक किमी अंतरावरून पाणी आणण्याची वेळ लोकांवर आली आहे . यामध्ये हे सगळे कष्ट अधिक प्रमाणात महिलांना करावे लागत आहेत .
तालुक्यातील छोटेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामनगर तांडा येथे साधारण साडेसातशे ते आठशे लोकसंख्या आहे . गावातील सर्व हातपंप कोरडेठाक पडले आहेत . बोअरवेल घेण्याचे प्रयत्न केले तर त्या ठिकाणी कोरडे पाषाणच . पाणी लागले नाही . यामुळे पिण्यासाठी व दैनंदिन गरजेसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गावाबाहेरुन एक किमी अंतरावरून वणवण भटकंती करून पाणी आणण्याची वेळ लोकांवर आली आहे . परिसरातील एक विहीर किंवा एक बोअरवेलचे पाणीही इतक्या कुटुंबांची तहान भागवू शकत नसल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते . त्यातच पाणी भरण्याचे काम महिलांना करावे लागत असल्याने महिलांना याचा अधिक त्रास होत आहे . कोरोनाच्या संकटात घराबाहेर पडण्याचे लोक टाळत आहेत , पण पाण्यासाठी मात्र वणवण करावी लागत आहे . या कारणास्तव ग्रामपंचायतीने तांड्याला टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी तांड्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे .

“परिसरात पाणीपातळी नक्की नाही . तसेच काळा पाषाण असल्याने पाणी लागण्याची शक्यता नसते . गेल्या वर्षी बोअर घेतला होता परंतु कोरडाच गेला . या वर्षी ढालेगाव बंधायांपासून पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे , कदाचित पुढील वर्षी तो मंजूर होईल .
– अंगदराव कटके , सरपंच.

Comments (0)
Add Comment