खून प्रकरणातील सर्वच आरोपी अटक करण्यात दिंद्रुड पोलीसांना यश

सर्व आरोपीस २९ पर्यंत पोलीस कोठडी
माजलगांव, प्रतिनिधी – शेतजमिनीच्या वादाचे कारण पुढे करून पुतण्यासह सख्ख्या भावाच्या कुटुंबाने वृद्धाला मंगळवारी दगड , विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे घडली होती .
या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्धाचा गुरुवारी सायंकाळी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता . यात दाखल गुन्ह्यातील आरोपी फरार होते .
यातील मुख्य आरोपी पुतण्यास दि . २५ रोजी पोलीसांनी अटक केले होते . तर इतर तीन फरार आरोपीसही रविवारी रात्री उशिरा अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दि . २९एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे . यासंदर्भात माहिती अशी की , धारूर तालुक्यातील हिंगणी खु येथील ज्ञानोबा ग्यानबा सोळंके यास हिंगणी येथे मंगळवारी सायंकाळी शेतातून घरी येत असताना घराजवळ त्यांना भाऊ मधुकर ग्यानबा सोळंके , शामल मधुकर सोळंके , सिद्धेश्वर मधुकर सोळंके आणि दयानंद मधुकर सोळंके यांनी अडवून जमिनीच्या कारणावरून भांडण केले . या वेळी ज्ञानोबा सोळंके यास दगड , विटांनी बेदम मारहाण केली . भांडणाची माहिती मिळाल्यानंतर ज्ञानोबा यांच्या मुलाने आणि इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत ज्ञानोबा यांची सुटका केली आणि त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले . तिथे उपचारादरम्यान ज्ञानोबा सोळंके यांचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला . या प्रकरणी वृध्दांच्या सख्या भावाच्या कुटूंबावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल होतो . यातील सर्व आरोपी खुन झाल्या दिवसापासून फरार होते . यातील मुख्य आरोपी सिध्दार्थ सोळंके याचा भांडणात हात फॅक्चर झाला होता . फरार असतांना परळी येथे उपचारासाठी जाऊन परत फकीर जवळा व चिखली शिवारात आल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती दिंद्रुड पोलीसांनी शुक्रवारी दि . २५रोजी रात्री चार तास शेतात फिरून पाहीले असता एका शेतकऱ्याच्या आखाड्यावर त्यास पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पकडण्यात आले . पोलीसांनी धारूर न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयाने २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती . या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरारच होते . हे फरार आरोपी रविवारी रात्री हिंगणी परिसरात वावरत असल्याची माहिती सपोनि अनिल गव्हाणकर यांना मिळाल्यावरून त्यांनी आपल्या सहकार्यासह हिंगणी परिसर पिंजुन काढत आरोपीचा शोध घेत असताना मधुकर ग्यानोबा सोळंके , शामल मधुकर सोळंके , दयानंद मधुकर सोळंके या तिन्ही आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात यश मिळवले . ही कामगिरी पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , डीवायएसपी श्रीकांत ढिसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल गव्हाणकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले . केवळ ७२ तासाच्या आत सर्व आरोपींना अटक केली . याबद्दल दिंद्रुड पोलीसांचे अभिनंदन होत आहे .

Comments (0)
Add Comment