सिंधुदुर्ग,दि 09ः
भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंचे सुपूत्र निलेश राणे यांनी राऊत यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून धमकी वजा इशारा दिला आहे. राऊत यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे म्हणाले की, ‘विनायक राऊत तुझी वेळ जवळ आली, 2024 ला तुझा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचं हद्दपार करणार.’
भाजप नेते नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरुन राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडे होते. ‘एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल’, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. यानंतर निलेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे राऊत यांना एकेरी शब्दात धमकी वजा इशारा दिला.
“नेहमीप्रमाणे विनायक राऊत भुंकायला बाहेर आले आहेत. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? भाजपाच्या लाटेत दोन वेळा हा माणूस निवडून आला,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊत यांना आव्हान देताना म्हटलं आहे की, “हिंमत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा, किती मत मिळतात ते पहा. पण ते हिंमत करणार नाही. आपण लाटेत निवडून आल्याचं त्यांना माहिती आहे”.
“खासदारकीचा एकही गुण यांच्यात नाही. सभागृहात तर अब्रूच काढत असतात. धड बोलता येत नाही, विषय माहिती नसतात. मातोश्रीचा चप्पलचोर अशी त्यांची ओळख आहे. हा मातोश्रीचा नवा थापा आहे,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.’हा स्वतः नॉन मॅट्रीक आहे. याला दोन बायका आहेत, याची बाहेर घाणेरडी लफडी आहेत. खासदारकीचा एकही गुण याच्यात नाही. याच्या कुठल्याही बोलण्यात काही अर्थ नसतो. खासदार होण्याचा एकही गुण याच्यात नाही. मातोश्रीवरचा थापा गेला आहे, आता हा नवीन थापा असून तो चप्पला उचलायची काम करतो. तुझी वेळ आता जवळ आली, 2024 ला तुझा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचा बाहेर काढणार. यापुढे भाषा बदलली नाही, तर जिथे दिसशील तिथे फटके घालेन,’ असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.