ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत हरपला आहे. तेलंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकार, साहित्यिकांची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढं नेईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वामनराव तेलंग यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह या नात्यानं तेलंग साहेबांनी महाराष्ट्रातील साहित्य चळवळ पुढं नेण्याचं काम केलं.

नवोदित लेखकांना मार्गदर्शन करुन साहित्यिक ओळख मिळवून दिली. परखड लेखनाच्या माध्यमातून पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या निधनानं विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची हानी झाली आहे.

Comments (0)
Add Comment