तारणहार – श्रीराम – मनाचे श्‍लोक (भाग 29)

॥पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥29॥
अर्थ: रघूनायक हा सर्वांचा तारणहार आहे .त्यांच्या पायातील तोडर त्यांच्या भक्त रक्षणाचे ब्रीद गर्जुन सांगतात .त्यांच्या भक्तांच्या शत्रून्च्या मस्तकी धनुष्यदंड बसणारच .
साक्षात काळालाही आपला दरारा श्रीरामाने दाखवला आणि अवघी अयोध्यापूरीतील प्रजा विमानीं बसवून वैकुंठास नेली .
मग तो तुझी उपेक्षा तरी कशी करेल ?
कांबि- धनुष्य
समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव व नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या काळात 1,100 मठ स्थापन केले. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि हनुमंतांची अकरा मंदिरे प्रसिद्ध आहेत.
समर्थ रामदास यांनी सुद्धा हनुमंत या देवतेबद्दल बरीच स्तोत्रं लिहिली. समर्थ रामदासांचे ’भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती’ हे त्यांचे स्तोत्र लोकपरिचीत ठरले.
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्‍लोकामध्ये आपल्या गुरुची स्तुती करतात.
समर्थ म्हणतात कि माझे प्रभू रामचंद्रांची पाऊले इतकी दिव्य आणि उत्तम आहेत कि त्यांच्या चरणांनी संपूर्ण भूमी उत्तमाची होते, नवस सायास पूर्ण होतात, शापितांचा उद्धार होतो, चरणस्पर्शाने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते.
समर्थ म्हणतात कि रामचंद्रांच्या दासांना घाबरण्याची कसलीही गरज नाही कारण भक्तांच्या शत्रूंवरती प्रभूचे धनुष्य खूप भारी आहे. रामभक्ती बरोबर तुमच्या कृतीची देखील त्याला जोड़ हवी. आणि रामभक्तांची कृती कधीही चुकीची नसणारच अशी खात्री समर्थाना आहे.
समर्थ म्हणतात कि हे मना तू स्थिर राहा, चंचल होऊन या विषय विकारांच्या मागे धावून संसारमायेत अडकू नकोस हा कलीचा फास आहे त्याला तू घाबरू नकोस आपल्या प्रभूच्या विवेकरूपी धनुष्याचा वापर करून प्रभूचे चरण धरून या कलीसारख्या विषयविकारांच्या शत्रूवर आपले भक्ती आणि मंगलाचारणाचे बाण सोडून त्यांचा अंत कर.
जीवनात मनुष्याला सुख आणी दुःख यांचे मिश्रण अनुभवावे लागते. त्यात सुखाचे प्रमाण अधिक का दुःखाचे हा प्रश्‍न थोडा वेळ बाजूला ठेवू. पण अत्यंत थोर माणसापासून ते लहानापर्यंत सर्वांना म्हणजे अवतारी माणसांनासुद्धा सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख या क्रमानेच जीवन जगावे लागते. त्यामध्ये घोटाळा असा होतो की, सुखाचा काळ सुरु असताना सामान्य माणूस अगदी हुरळून जातो. पण त्याला हे माहित नसते की, तो काळ तसाच राहत नाही. तो पालटला की, सुखमय परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. मग मात्र माणूस दुःखाने होरपळून जातो. ही शोकांतिका टाळण्यासाठी मनुष्याने नेहमी भगवंताला घट्ट धरून ठेवावे.
बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा. देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात –
‘देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला । पहा महिमा आवडीची फळे खाय भिल्लिणीची ॥ पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची । न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडें तुका म्हणे भक्तिपुढे ॥’
कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे मोक्ष. मोक्षाची संकल्पना कर्माच्या व पुनर्जन्माच्या सिद्धांतांशी निगडीत आहे. कर्मांचा आणि पुनर्जन्माच्या परंपरेचा नाश झाल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतो.
आपला परमेश्‍वर आपलं हे जीवनाचं विमान मोक्षाला नेणार आहे. असे समर्थ या श्लोकातुन आपल्या मनाला समजावून सांगत आहेत.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

manache shlokमनाचे श्लोक
Comments (0)
Add Comment