पुणे – कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्व दूर परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. लॉकडाउनमुळे सामान्य कुटूंबाची परवड होत आहे. आर्थिक चणचण भासत असून त्यात रोजगार बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. औद्योगिक क्षेत्रात शुकशुकाट जाणवतोय बहुतांशी कंपन्या बंद आहेत तर कृषी पूरक उद्योग यांना शासनाने कमीत कमी कामगारांमार्फत अति महत्वाचे काम करण्यास सहमती दिली आहे. काम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कंपनी आणि कामगार यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. दोन्ही धास्तवलेल्या परिस्थितीला तोंड देत आहेत.
पुण्याजवळील थेऊर येथील टिश्यू कल्चर क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य कंपनी राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीवर ही याचे पडसाद उमटले आहे. यात 90 टक्के महिला कार्यरत त्या आजूबाजूच्या खेड्यातुन कामसाठी येतात त्यांनाही लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कंपनीच्या कामगाराबरोबरच थेऊर येथील गोर गरीब व हातावर पोट भरणाऱ्या गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कंपनीने खारीचा वाटा उचलत सुमारे 900 कुटूंबियांना कोरोनाच्या हाहाकारात माणुसकीचा हात दिला आहे. त्याना आवश्यक अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे अन्न धान्य किट कुटूंबातील प्रमुखाना देण्यात आले आहे. यात एक महिना पुरेल इतके तांदूळ, तेल, डाळी किराणा साहित्य इ वाटप करून गरजूंना दिलासा दिला आहे. सोशल डिस्टेन्सिग, मास्क, सॅनिटायझर चा वापर करीत सुरक्षा व खबरदारी घेत नागरिकांनी स्वीकार केला व राईज अँड शाईन कंपनीचे लाभार्थ्यांनी आभार मानले.