पुणे – दिल्ली सीमांवरील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम युवक क्रांती दलाने आयोजित केला आहे .बुधवार, दिनांक १७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन सभागृह येथे हा कार्यक्रम होईल. युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह संदीप बर्वे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘किसान पंचायत ‘ असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
मूळचे उस्मानाबादचे मात्र इंग्लंड मध्ये वकिली करीत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते एड. सिध्दार्थ लिखीते, युवक क्रांती दलाचे राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, युक्रांदचे सदस्य ओंकार शिंदे या कार्यक्रमात सहभागी घेतील. संदीप बर्वे त्यांच्याशी संवाद साधतील. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित शारिरीक अंतर ही त्रिसुत्री आणि सरकारच्या कोविड सूचनांचे पालन करून हा कार्यक्रम होईल.
सिध्दार्थ लिखीते मुळचे उस्मानाबादचे आहेत. २००५ पासून ते इंग्लंडमध्ये वकीली आणि व्यवसाय करीत आहेत. शेतकरी आंदोलनावर मोदी सरकार करत असलेली अमानवी दडपशाही समजल्यावर ते दिल्ली सीमेवर पोहोचले. जानेवारी महिन्यापासून ते दिल्ली सीमा आणि पंजाबमध्ये फिरत आहेत. महापंचायतींमध्येही ते सहभागी झाले आहेत.
अप्पा अनारसे हा युक्रांदचा युवा प्रतिनिधी म्हणून दिल्ली आंदोलनात सहभागी झाला. त्यातून प्रेरणा घेऊन तो कर्जत तालुक्यात ( जिल्हा अहमदनगर ) शेतकरी संवाद यात्रा करीत आहे. अनेक वर्षांपासून तो शेतक-यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखंड कार्यरत आहे.
ओंकार शिंदे कायद्याचे शिक्षण घेत असून विद्यार्थी म्हणून तो दिल्ली आणि मुंबई शेतकरी आंदोलनात अनेक दिवस राहीला.या तिन्ही कार्यकर्त्यांना या आंदोलनात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले. एका ऐतिहासिक लढ्याचा साक्षीदार होण्याचा अनुभव त्यांनी घेतला.त्यांचे अनुभव आणि निरीक्षण ऐकण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे ,असे संदीप बर्वे यांनी सांगितले.