मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥7॥
अर्थ: हे मना, तुझ्याकडे नेहमी धाडस, धैर्य असायला हवे आणि कोणी दूषणे दिली असल्यास ती सोसायची ताकत असायला हवी. आपण नेहमी नम्र भाषेत बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे.
या श्लोकात समर्थ समजावताहेत की हे मानवा, श्री रामाचा आनंत मार्ग अनुसरायचा असेल तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणे आवश्यक आहे. संसारात वेगवेगळ्या प्रसंगाना धाडसाने तोंड देतो तसेच धाडस, म्हणजेच धैर्य हे परमार्थाच्या मार्गाने जाण्यामध्येदेखील काही अडचणी आल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी मनामध्ये असले पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्ग क्रमणे तुला शक्य होणार नाही. या परमार्थसाधनेच्या मार्गात कोणी चेष्टा केली, अयोग्य शब्दांनी तुझा पाणउतारा केला तरी तू ते सहन करून त्याच्याकडे डोळेझाक केली पाहिजे, सोशिकपणा दाखवला पाहिजे आणि स्वत: अतिशय नम्रपणाचे वर्तन ठेवले पाहिजे. धैर्यपूर्ण, सहनशील आणि नम्र वागण्याने तू समस्त लोकांना आपलेसे करून घ्यायला पाहिजे.
या सृष्टीमध्ये आपण जसे वर्तन करतो तसेच आपल्याला त्याचे प्रतिउत्तर मिळत असते. जसे व ज्याचे बीज पेरले जाते त्याचेच रोप उगवते, म्हणून जसे आपण कर्म करू तसेच आपल्याला फळ मिळते. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे (ङरु जष -ीींींरलींळेप-र्एींशीू रलींळेप ींहशीश ळी र्शिींरश्र रपव ेििेीळींश ीशरलींळेप.)
वयाच्या 12 व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.
सहनशीलता आणि धैर्य अंतःकरणामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मन चंचल न राहता शांत राहते, मनाची व बुद्धीची वैचारिक पातळी वाढते आणि बुध्दीमधे विवेक जागृत होतो व उत्तम कार्यभाग होतो परिणामी त्याचे फळदेखील उत्तम प्राप्त होते.
नम्र व्यक्ती इतरांचा आदर करते. ती उद्धटपणे वागत नाही किंवा इतरांनी तिला विशेष मान किंवा आदर द्यावा अशी ती अपेक्षा करत नाही. ती मनापासून इतरांचा विचार करते आणि त्यांच्याकडून शिकून घ्यायला तयार असते.
काही जण विचार करतात की नम्र व्यक्ती कमजोर असते पण हे खरं नाही. खरंतर नम्र असल्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होण्यासाठी आणि मर्यादा ओळखण्यासाठी मदत होते.
महापुरे झाडे वाहती,
तेथे लव्हाळे वाचती।
तुकोबाराय म्हणालेत; ते किती खरं आहे.. लहानपणातच म्हणजे नम्रपणातच मोठेपण दडलेलं असतं. स्वभावातली नम्रता माणसाला यशाचं शिखर दाखवत असते.
नम्रता आपल्याला आंतरबाह्य व्यक्त करत असते. नम्रतेचे पाय मातीचे हवेत आणि हात मात्र संस्कारांचे हवेत. मग आपण खूप काही रुजवू शकतो, फुलवू शकतो, साकार करू शकतो.. नम्रतेमध्ये नजाकत हवी.. स्वाभाविकता हवी.. सजगता हवी.. मग नम्रता भरभरून देत असते सर्वकाही मनासारखं.. मनसोक्त.
जगाचा आवाका असतो ज्यांच्या डोक्यात तीच डोकी झुकत असतात; इतरांसमोर..
झुकता वही हैं; जिस में जान होती हैं । अकडे रहना मुडदे की पहचान होती हैं ॥
आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते प्राप्त करण्यासाठी विनयशीलताच महत्त्वाची असते. म्हणूनच असं म्हटलं गेलंय ‘विद्या विनयेन शोभते’..
असे ही म्हणतात की,
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
म्हणून समर्थ सांगतात कि समाजामध्ये कितीही निंदा झाली तरी ती आत्मसात करावी व क्रोध न करता नम्रतेची भावना ठेऊन समोरच्या लोकांना समजून घ्यावे आणि परिस्तिथिनुसार विवेकबुद्धीने धैर्य ठेऊन पाऊल उचलावे.
आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्याला त्यामुळे आत्मसंतुष्टता येते.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई