दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट (जि.वर्धा) दि.१७
हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण केंद्रीय वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.17) करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील अनेक विकास कामे रस्ते जवळपास पूर्ण होत असून वर्धा जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे केंद्रीय वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले, आमदार समीर कुणावार यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे एम्स वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी दिले,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केंद्र सरकारच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक शिवाजी मार्केट यार्ड येथे आज या उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर,वर्धाचे आमदार डॉ.पंकज भोयर,आर्वीचे आमदार दादाराव केचे, विधान परिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड. सुधीर कोठारी,हिंगणघाट नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरीता गाखरे, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सौ.शारदा आंबटकर,समुद्रपुर प.स.सभापती सुरेखा टिपले,वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार इत्यादि मान्यवर व्यासपीठावर हजर होते.
राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव येथील उड्डाणपुलाचा शिलान्यास करुन ना.गडकरी हे दुपारी १.३० च्या सुमारास हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पोचले, त्यांनी नांदगाव चौक येथील सुमारे १.४२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले,आमदार कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे या पुलास ना. गडकरी यांनी केंद्र सरकारतर्फे निधी देऊन मंजुर केला होता. सदर पुलाच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय महामार्ग पलीकडे राहणाऱ्या शहरी व ग्रामीण लोकांना मोठी सुविधा झाली आहे. आमदार कुणावर यांनी वणा नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला असता गडकरी यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, नागपूरच्या धर्तीवर नदीतुनही भविष्यकाळात वॉटर टॅक्सी सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी केले तर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निदेशक यवतकर यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमाचेवेळी भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, भूपेंद्र शहाणे,माजी जि.प.अध्यक्ष नितिन मडावी उपस्थित होते.