कंधार, उमर शेख – अग्नितांडवात निकस झालेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये,आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येईल,असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी व्यक्त केला,सामाजिक कार्यकर्त्या सौ.शिंदे यांनी नुकतीच पानशेवडी व तळ्याचीवाडी परिसरातील तांड्याना भेट देऊन आगीने जळून गेलेल्या शेतीची पाहणी केली,या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या रविवारी तालुक्यातील तळ्याचीवाडी व पानशेवडी परिसरातील ढाकुतांडा, रामातांडा, गणातांडा आदी भागात आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास अडीच हजार हेक्टर शेतजमीन आगीने प्रभावित झाली होती. २५ हजार कडबा व शेती साहित्य मोठ्याप्रमानात जळून खाक झाले होते. बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शिंदे यांनी या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या सोबत नायब तहसीलदार विजय चव्हाण, पानशेवडीचे सरपंच कोंडीबा मोरे, संगमवाडीचे सरपंच प्रभाकर केंद्रे, व्यंकट गर्जे आदीजन होते.
सौ. शिंदे यांनी आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महसूल प्रशासनाकडे केली. पानशेवडी व तळ्याचीवाडी येथे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या भागाची पाहणीही करून त्यांनी या भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे व स्वतः मी कटिबद्ध असून लवकरच या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी दत्ता पाटील शिंदे, माधव घोरबांड, अशोक पाटील कळकेकर, श्याम पाटील सावळे, योगेश नंदनवनकर, शेख शेरूभाई, अजीम भाई, वसंत मंगनाळे यांच्यासह तलाठी, प्रशकीय कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.