परभणी,दि 27 (प्रतिनिधी) ः सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण स्थगीती प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (दि.27) पुढे ढकलण्यात आली.त्यासाठी राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप करत परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या विषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना सरकारी वकीलच अनुपस्थित राहिले. परिणामी, न्यायालयाने सुनावणी काही काळासाठी तहकुब केली. चार आठवडे पुढे ढकलली. त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार हे फारसे गंभीर नाही, हेच स्पष्ट झाल्याचा आरोप क्रांतीमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाचा राज्य सरकारवर विश्वास नसेल तर आपला वकील लावावा, असे विधान करीत समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोपही या संतप्त कार्यकर्त्यांनी केला. सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.यावेळी समाजाचे जेष्ठ नेते सुभाषदादा जावळे, किशोर रणेर, विठ्ठल तळेकर, गजानन लव्हाळे, अरुण पवार, विजय जाधव, गजानन जोगदंड, रवी घयाळ व अशोक बोकन आदी उपस्थित होते. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे हा चौक दणाणून गेला.