पावसाळी सायंकाळ

दिवस पावसाळ्यातला. दुधाळ अंधार. मध्येच विजेचा तडाखा! किती मनोहरी दृश्य! तरुणाईला घराबाहेर पडण्याचा मोह होणार नाही तर नवलच! खडककपार्‍यातून खळाळणारे दुधाळ फेसाळलेले ओहोळ, धबधबे! स्वर्ग काय निराळा असेल! असे स्वप्नवत जीवन! सखीचा हात हातात घेऊन भाजलेले मक्याचे कणीस खात त्या रम्य वातावरणात भटकण्याची संधी कोण सोडेल? कॉलेजातील तरूणतरूणींना तरी सहलीला येण्याची पर्वणी !अशीच ती सायंकाळ! पाऊस रिमझिम करता करता कधी मुसळधार कोसळू लागतो हेही ध्यानात येत नाही! कारण तोही आपल्यासारखाच! आपणास भिजवण्याची एकही संधी तो सोडत नाही. तरुणींच्या बटांना वार्यावर खेळविण्यात त्याचा हातखंडा! आणि हे काय? त्यांची ओढणी खेचून नेण्याची या वार्‍याची खट्याळ लकब तरी फार जुनी! जणूकाही ती तरुणी लाडात येऊन विचारतेय


असा कसा रे पावसा
तू खट्याळ नि नाठाळ
उडवतोस माझ्या बटां
वात्रट आणि खोडसाळ
तिला त्याची गंमतही करावीशी वाटते. जलधारा मुठीत पकडून ती त्यालाच भिजवू पाहते परंतु तो द्वाड पाऊस दडीच मारून बसतो.असा हा आभासी पाऊस आपणा सर्वांचाच लाडका!सखाच जणु!घननीळ आभाळातून ओघळताना तो किती मनोहारी वाटतो! त्याचा एकेक टप्पोरा थेंब अंगावर घेताना अंगांग शहारून उठते. असे वाटते जणू आपला सखाच आपल्या मऊ कोमल हातांनी कुरवाळत आहे. आपणही डोळे गच्च मिटून त्याचा सहवास मिटल्या डोळ्यांनी टिपत असतो.

हवाहवासा त्याचा स्पर्श आपणास पुलकित करत असतो. हातातली छत्री उडून गेल्याचेही मग भान राहत नाही. अशा या रम्य सायंकाळी मन मयूर सप्तरंगी रंगात डोलू लागतो.
असा येतो पाऊसवारा
टपोर्‍या अशा जलधारा
मूठीत त्यांना झेलू पाहता
संगे नेतो तो वात्रट वारा

मोरदेखील पावसाच्या सरी अंगावर घेत आपला सप्तरंगी पिसारा फुलवून थुईथूई नाचू लागतो. लांडोरला साद देऊ लागतो. दूरवरून कोकिळ कुहुकुहु करत कोकिळेला बोलवत असतो.चातकपक्षी आपली तहान भागवून आकाशात उंच गिरकी घेतो. पावशापक्षी मानवाचा मित्रच! ’पेरते व्हा’ असा सल्ला देत आपणास बी-बियाणे पेरण्यासाठी सूचित करत असतो.इवलीशी पाखरे घरट्यातून इवल्या चोची बाहेर काढुन तुषार झेलत चिवचिवताना पाऊस डोळ्यात साठवत असतात.

’मन डोले मेरा तन डोले’ अशीच अवस्था ह्या सजीव जगतात झालेली असते. सार्‍या चराचरांत चैतन्य पसरले जाते. दर्‍यांखोर्‍यांतून खळाळणारे झरे नि दुधाळ धबधबे दर्‍यांना फुलवत राहतात. डोंगरावर तृणाची हिरवळ पसरून जणू गालिचाच अंथरल्याप्रमाणे भासते. धबधब्यांनी कातळालाही जणू छिद्रे पाडून प्रवाह सुरू होतो. झुळझुळ झरे मधुर जलाचा प्रवाह घेऊन नदीपर्यंत वहायला लागतात.जणू नदीला सांगतात, बघ तुझे नि सागराचे मिलन करण्यात आमचाही वाटा आहे. उठ जागी हो! आम्ही येऊन तुला मिळतो. लाग सागराच्या वाटेला!

सार्‍या निसर्गात चैतन्य उभारते नि स्वैर मनाला आवर घालू शकत नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण त्या पावसात धबधब्याखाली नाचत-गात मस्त डुंबत राहतात. जणूकाही म्हातार्‍या नाही बालपण फिरून आल्यासारखे वाटते.

येरे येरे पावसा तुला देतो पैसा
या गाण्यांच्या ओळी प्रत्येक ओठावर ऐकू येतात.सर्व चराचराला स्फूर्ती देणारा असा हा पाऊस!

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

marathi sahityaपावसाळी सायंकाळमराठी लेखमराठी साहित्य
Comments (0)
Add Comment