पुणे, प्रतिनिधी – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल गुरूवारी (दि. १६) जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैमध्ये जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल जाहीर होत आहे.
‘या’ वेबसाईटवर पहा निकाल :
mahresult.nic.in/
hscresult.mkcl.org
maharashtraeducation.com
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून एकूण १५ लाख पाच हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात आठ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी आणि सहा लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनी आहेत. परीक्षेसाठी नऊ हजार ९ २३ कनिष्ठ महकाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी राज्यात एकूण तीन हजार ३६ परीक्षा केंद्रे होती.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकनसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.inया वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.