मॉक ड्रील असल्याने कुणीही अफवा पसरवू नये – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत
बुलढाणा : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात 20 मिनिटांची ‘मॉक ड्रील’ (प्रात्याक्षिक) 22 मार्च 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात आली. प्रात्याक्षिकात कोरोनाग्रस्त रूग्णाला रूग्णालयातील आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात आणून त्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या तसेच रूग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात आली.
ही केवळ मॉक ड्रील असून अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरली आहे. तरी ही केवळ आरोग्य प्रशासनाच्या तयारीचा भाग म्हणून घेण्यात आलेले प्रात्याक्षिक आहे. कुणीही मॉक ड्रीलमधून रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरवू नये. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवू शकते. या प्रात्याक्षिकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनीही सहभाग घेतला. तसेच डॉ. वासेकर व त्यांची चमू या प्रात्याक्षिकात सहभागी झाली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.