खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट 85 टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या सूचना
खरीप हंगामाच्या पीक कर्जाचा घेतला आढावा
परळी – परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी मतदारसंघात खरीप हंगाम पूर्व कर्ज आढावा बैठक घेतली. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी मागण्या तसेच बँकांना कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी ना. मुंडे यांनी समजून घेतल्या. मतदारसंघातील एकही शेतकरी पीककर्जापासून वंचीत राहू नये असे यावेळी ना. मुंडे म्हणाले.
मागील वर्षी खरीप हंगामामध्ये बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ 41 टक्के पूर्ण झाले होते यावर्षी हे उद्दिष्ट वाढवून पीक कर्ज वाटप 85 टक्क्यांपर्यंत करावे अशा सूचना यावेळी ना. मुंडे यांनी बँकेच्या प्रतिनिधींना दिल्या.
या बैठकीला जिल्हा निबंधक शिवाजी बडे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, परळीचे तहसीलदार विपिन पाटील अंबेजोगाईचे तहसीलदार रुईकर, जि. प. गटनेते अजय मुंडे, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ पौळ यांसह मतदारसंघातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी मध्ये नाव आले परंतु त्यांना कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात आणखी मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज देण्यासाठी राज्य शासनाने धोरण आखले असून त्या धोरणानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जामधील बेबाकी प्रमाणपत्राची अट शिथिल करावी तसेच बँकांनी प्रत्येक गावात जाऊन कॅम्प घेऊन त्याद्वारे पीक कर्ज पूर्व संकलन करावे तसेच शेतकऱ्यांना बँकेत न बोलवता ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून कर्ज वाटप करावे अशा सूचना यावेळी ना. मुंडे यांनी बँकेच्या प्रतिनिधींना केल्या. या बैठकीस परळी मतदारसंघातील सर्व प्रमुख बँकांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
दरम्यान कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात मंदावली तसेच मान्सून हंगाम तोंडावर आल्याने थोड्याफार प्रमाणात पूर्वीचे पीक कर्ज बाकी असलेल्या शेतकऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणार की नाही अशी चिंता भेडसावत होती, मतदारसंघातील अशा सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
सिरसाळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी पाठपुरावा…
दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा हे मोठे गाव असून येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असावी अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. त्यानुसार ना. मुंडे यांनी सिरसाळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा लवकरात लवकर सुरू करणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले आहेत.