मनाचे श्लोक : भाग-१

1.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥1॥
अर्थ: गणेश, जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वती, जी चारही वाणींची मूळ आहे.
तिला नमन करू आणि मग श्रीरामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू.
समर्थ सुरुवात करतात ती मंगलाचरणाने.
कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून मगच शुभारंभ करतो. ही आपली संस्कृती व परंपरा आहे.
समर्थ रामदासस्वामींनी पहिल्या श्‍लोकात प्रथम देवांचा देव श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता सरस्वती हिला वंदन केले आहे.
पहिल्या ओळीत त्यांनी गणाधीश गणेश देव हा सर्व गुणांचा अधिपती असे संबोधित केले आहे. आणि तोच मुळारंभ आहे.
असे म्हणतात की कुठल्या ही कार्याची सुरूवात करताना पहिले पाऊल फार महत्वाचे असते. त्या करीता सुखकर्ता दुखहर्ता गणेशाची कृपा व माता सरस्वतीचा आशिर्वाद कार्यसिद्धी करण्यास चैतन्य व नवे बळ देतो.
॥जय जय रघुवीर समर्थ॥

ज्योती कुलकर्णी, मुंबई

Comments (0)
Add Comment