बालपणापासून मला निसर्गात रमण्याचे भारी वेड! कोणत्याही वृक्षाच्या सावलीत बसले की त्यावरील पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्यांनी काढलेल्या आवाजाला तशीच साद घालणं आणि तो छंद मी आजही जपला आहे. वृक्षाखाली बसले की कोण कोणते पक्षी झाडावर बसलेत इथे माझी नजर भिरभिरत असते. मग ती साळुंकी असो की मधुर स्वरात गाणारा कोकिळ. मला नानारंगी आणि सुगंध देणार्या फुलांचे भारी वेड! बालपणी रोज माझ्या वेणीत एक तरी गुलाबाचे फूल विराजमान व्हायचेच! सकाळी उठून अंगणातल्या फुलांच्या घमघमाटात मोगर्याची, जाईजुईची, शेवंतीची फुले तोडण्याचा मलाच नव्हे तर आम्हा सर्व बहिणींना नाद होता. त्यामुळे आपणास जास्त फुले मिळण्यासाठी लवकर उठायचो.फुले तोडण्यासाठी आम्हां बहिणीच्यांत अहमहमिका लागायची. फुलांचा गजरा केसातून गळ्यात पडेपर्यंत मोठा झाला की धन्य व्हायचो. आमच्या कॉलनीत सर्वांच्या अंगणातील बागा बहरलेल्या असायच्या. आमच्यासमोर राहणारे चव्हाण काका, त्यांना मुलगी नसल्याने त्यांच्या अंगणातील मोगर्याची, गुलाबाची फुले नेण्यासाठी हटकून हाक मारत. मग तरी आम्हाला पर्वणीच वाटायची. तोंडापेक्षा मोठे गुलाबाचे टप्पोरे फूल केसात खोवले की सौंदर्य खूप वाढलेय असा भास व्हायचा. कोणी चिडवत म्हणायचेही
अगं तुझ्या तोंडाहून मोठे गुलाबाचे फूलच आहे
दररोज सकाळचा अर्धा तास वेळ फुले गोळा करून गजरा बनवण्यासाठी राखून ठेवलेला असे. रात्रीच सर्व कळ्या मोजून ठेवल्या जायच्या. पण आई रात्री कळ्या तोडू द्यायची नाही. ती म्हणायची, अगं ही झाडंवेलीही सजीव आहेत. आपणाला जशी झोपेची गरज आहे तशी त्या झाडवेलींनाही आहे. झोपलेल्या रोपट्यांना उगाच उठवू नका. कळ्या तोडू नका मग सकाळ होईपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्यायच नसे.अंगणातली ही बाग माझ्या आवडीचा विषय असायचा आणि त्या बागेला फुलण्यासाठी आम्ही धडपड करायचो. आम्ही रोज बागेत पाईप लावून पाणी द्यायचो.बाबा अधून मधून त्या मातीत खत टाकत. त्यामुळे वर्षभर बाग फुलांनी बहरलेली दिसायची. फुलांचे ते वेड आजही कायम आहे.
फुलावा बागबगिचा फुलांनी
परसदारी असावीच भाजी
सदृढ निकोप जीवनासाठी
असेल निसर्ग सदाच राजी
फूलांच्या बागेप्रमाणेच माझ्या आईबाबांनी घराच्या बाजूच्या रिकाम्या जागेत माळवे लावलेले होते. माझ्या वडिलांच्या हाताला नि कष्टाला फळ खूप. म्हणूनच सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे आमच्या परसदारी भरलेले असायचे. त्यामुळे ताजी वांगी, टोमॅटो कच्चीच तोडून खायचो. आंबा, जांभूळ, पेरू, पपई, सीताफळ यांची खूप झाडे होती. त्यांना पाणी मुबलक असल्याने फळंही खूप लागायची.मग माझी आई कोणाच्या लग्नाला जाताना करंडी भरून जांभळे घेऊन जायची. सीताफळे, पपया तरी अतिशय गोड आणि सर्व विटामिन युक्त.
त्यामुळे बालपणापासून घरच्या आणि नैसर्गिक भाज्या फळांचा रतीब असल्याने तब्येत निकोप आणि निरोगी असायची. डॉक्टर कडे कधीच जावे लागले नाही. आमच्या आई-बाबांचे नेहमी सांगणे असे, खाऊन पिऊन तंदुरुस्त रहा. डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणारच नाही. आम्ही रहायचो त्या गावात साखर कारखाना होता आणि चेअरमन साहेबांची खूप मोठी पोल्ट्री होती. त्यामुळे कोंबड्या अंडी अगदी स्वस्त दरात मिळायची. त्यामुळे फळे ,भाज्यातून उरलीसुरली कसर यातून भरून निघायची. तसेच चांगल्या प्रतीचा असा रोज दारातच उस मिळायचा. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी मध्ये मोठे घमेले ठेवून प्रत्येक जण त्याच्या सभोवती ऊस खायला बसायचा. रसही मिळायचा आणि ऊस चावून खाल्ल्याने दातही पक्के झाले. त्यामुळे आजतागायत दातांची काही तक्रार नाही.
चंदन, सागवान, आंबा, जांभूळ, वड, पिंपळ ,एरंड,शेवगा,चिंच अशी हजारो झाडे परसात आणि रस्त्याच्या कडेला उगवलेली दिसायची.त्यांचे लाकुड विविध कामांसाठी उपयोगी पडायचे. अगदी घरातील सरपणापासुन घरबांधणी आणि फर्निचरही त्यापासुन बनवले जायचे.हल्ली मानवाने वृक्षांच्या मूळावरच घाव घातला आहे.अधुनिकतेच्या कारणास्तव वृक्ष अमर्याद तोडले जात आहेत तरी मानवाने वृक्षारोपणाचाही वसा हाती घ्यावा. रोज एकतरी झाड लावून पर्यावरणाचे संतुलन टिकवावे म्हणजे अवर्षण, अवकाळी अशा अनैसर्गिक आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागणार नाही.
पेरूया जमिनीवरी रोज
एकतरी झाड आणि वृक्ष
बांधतील खोपे पक्षी त्यावर
होणार नाही भूमाता रूक्ष
वृक्ष वेली मानवाला फक्त फळे, फुले,अन्नधान्य आणि भाज्याच पुरवत नाहीत तर उन्हात चालून आलेल्या पांथस्था ला आपल्या दाट छायेचा थंडावा देतात. जीवनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू पुरवतात. त्यांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवल्यामुळे जमिनीची धूप टाळता येते. मानवाला आवश्यक असणारा सर्व पर्जन्यपुरवठा केवळ वृक्षच करू शकतात. त्यामुळे आजही माणसाच्या हातात अवधी आहे. वृक्षांची लागवड करून पुढील पिढीला आपले भवितव्य सुधारण्याची संधी द्यावी हेच खरे. आज आपण आपल्या आजोबा, पणजोबांनी लावलेल्या वृक्षराईची फळे आनंदाने खात असतो. तशीच आपली नवीन पिढी देखील आपण लावलेल्या बीजाचे आणि त्या वृक्षांचे उपभोग घेतील ही जाणीव ठेवावी.
फळे, फुले, भाज्या यांनी बहरलेला,फुललेला हा निसर्ग खूप सुंदर दिसतो आणि ही सृष्टी किती विलोभनीय दिसते हे त्याची शोभा पाहणार्यालाच ठाऊक ! हिरवीगार झाडे, वनराई त्यात बागडणारे पशू-पक्षी आणि हिरवळीने फुललेले डोंगर-दर्या पाहताना मन कसे प्रसन्न होऊन जाते. मनावर आलेली मरगळ देखील निघून जाते. म्हणूनच मनावर मळभ आले असेल तर वनराईतून फेरफटका मारताना मनाला तजेला येतो, टवटवी येते आणि आजारी असलेल्या माणसाला फुलांचा गुच्छ दिला असता त्याचा अर्धा आजार पळून जातो.
यावी कानावर गुराख्याच्या
बासरीची सुरेल मधुर तान
जाईल कामाचा शीण सारा
मनही होईल टवटवीत छान
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835